
NEET परीक्षांचा गोंधळ संपताना दिसत नाही. नीट-पीजी २०२६ च्या उमेदवारांना चुकीच्या परीक्षाकेंद्रांच्या ठिकाणांचे एसएमएस गेल्याच्या तक्रारी आल्या. यानंतर आता नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) ने बुधवारी सांगितले की, तांत्रिक कारणांमुळे काही नीट-पीजी २०२६ उमेदवारांना एसएमएसद्वारे चुकीच्या परीक्षा केंद्रांच्या शहराची माहिती अनवधानाने पाठवली गेली.
योग्य परीक्षा केंद्रांचे शहर दर्शवणारे एसएमएस आणि ई-मेल त्यानंतर पाठवण्यात आले आहेत, असेही बोर्डाने यावेळी सांगितले. पीटीआयने हे वृत्त दिले आहे.
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणारी नीट-पीजी २०२६ परीक्षा ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. ‘नीट-पीजी २०२६ अर्जदारांना परीक्षा केंद्रांच्या शहराचे वाटप नियोजित वेळापत्रकानुसार एनबीईएमएसच्या संकेतस्थळाद्वारे कळवण्यात आले आहे’, असे बोर्डाने उमेदवारांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
‘काही तांत्रिक गडबडीमुळे काही उमेदवारांना एसएमएसद्वारे कळवण्यात आलेले परीक्षा केंद्रांचे शहर चुकीचे होते. त्यानंतर योग्य वाटप केलेले परीक्षा केंद्रांचे शहर दर्शवणारे एसएमएस आणि ई-मेल पाठवण्यात आले आहेत’, असे त्यात म्हटले आहे.
योग्य परीक्षा केंद्रांच्या ठिकाणांचा तपशील एनबीईएमएसच्या संकेतस्थळावरील सर्व उमेदवारांच्या अर्जदार पोर्टलवरही उपलब्ध आहे, असे बोर्डाने सांगितले.
उमेदवारांनी त्यांना वाटप करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांच्या शहराबाबत अचूक माहिती मिळवण्यासाठी एनबीईएमएसच्या संकेतस्थळाचा आधार घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
‘नेहमी एनबीईएमएसकडून येणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. बनावट संकेतस्थळे आणि चुकीच्या माहितीपासून सावध राहा’, असे बोर्डाने म्हटले आहे.
उमेदवारांना यापूर्वी मिळालेल्या एसएमएसवरच अवलंबून न राहता अधिकृत एनबीईएमएस पोर्टलवर जाऊन त्यांना वाटप केलेले परीक्षा केंद्रांचे ठिकाण तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.




























































