बांधकाम मलब्यापासून आता पेव्हर ब्लॉक, खडी आणि वाळू; प्रक्रियेसाठी पालिका तीन प्लांट उभारणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील बांधकामातून निर्माण होणाऱया डेब्रीजसारख्या मलब्यापासून पालिका आता पेव्हर ब्लॉक, खडी आणि वाळू तयार करणार आहे. दररोज निर्माण होणाऱया दोन हजार मेट्रिक टन कचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी पालिका तीन सुसज्ज प्लांट उभारणार आहे. शिवाय पाडकामाच्या कचऱयाचे प्रदूषण रोखण्यासाठी बांधकाम व पाडकाम कचरा वाहून नेणाऱया वाहनांवर जीपीएस सिस्टीम बसवणे बंधनकारक असणार आहे.

मुंबईत सुरू असणारी बांधकामे आणि पाडकामातून दररोज दोन हजार मेट्रिक टन कचरा तयार होतो. हा कचरा मोठय़ा प्रमाणात रस्त्यांच्या कडेला, नाल्यांमध्ये किंवा मोकळय़ा जागांमध्ये टाकला जातो. त्यामुळे प्रदूषण, वाहतूककाsंडी आणि पूरस्थिती निर्माण होते. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. शिवाय नैसर्गिक संसाधनांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. मुंबईत आधीच दहिसर आणि ठाण्यात 600-600 टीपीडी क्षमतेचे दोन सी अँड डी प्रक्रिया प्रकल्प कार्यरत असून नव्या सुविधांमुळे प्रक्रिया क्षमता आणखी वाढणार आहे.