
सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे यंदा ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कारांची’ घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी दोन मराठीतील उत्कृष्ट अनुवादित पुस्तकांना संयुक्तपणे जाहीर करण्यात आला आहे.
रोहन प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेल्या आणि साशा स्टानिसिच यांच्या मूळ जर्मन पुस्तकावरून जयश्री जोशी यांनी मराठीत अनुवादित केलेल्या ‘पाळंमुळं’ या पुस्तकाचा समावेश आहे. तसेच कलासक्त प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या आणि इतो ओगावा यांच्या मूळ जपानी पुस्तकावरून मयुरेश कुलकर्णी यांनी अनुवादित केलेल्या ‘त्सुबाकी स्टेशनर्स’ या पुस्तकालाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी कवी विंदा करंदीकरांच्या जन्मदिनी हा पुरस्कार घोषित केला जातो.
तज्ञ परीक्षक निखिलेश चित्रे, करुणा गोखले आणि गणेश मतकरी यांनी या पुस्तकांची निवड केली आहे. लवकरच हे पुरस्कार प्रदान करणार असल्याची माहिती आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राचे अध्यक्ष प्रफुल्ल शिलेदार यांनी दिली आहे.


























































