
भिवंडी तालुक्यातील दिंडीगड डोंगरावर रविवारी दुपारच्या सुमारास दोन गटांत तुफान राडा झाला असल्याची घटना घडली. काही तरुणांचा एक गट दिंडीगडाच्या डोंगरावर मांसाहारी जेवण घेऊन जात असताना दुसऱ्या तरुणांच्या गटाने त्यांना अडवले. यानंतर दोन्ही बाजूंनी बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत सहाजण जखमी झाले असून भिवंडी तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिंडीगडावर फिरण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. आज सुट्टीच्या दिवशी असाच एक तरुणांचा गट दिंडीगडाच्या डोंगरावर जात होता. त्या तरुणांच्या हातात मांसाहारी जेवण असल्याचे लक्षात येताच दुसऱ्या गटातील तरुणांनी त्यांना अडवले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू झाले. वादाचे रुपांतर जोरदार हाणामारीत झाले. यामध्ये अस्तमेश शेख, उमैर शेख, हसनेन पठाण, अब्दुल रेहमान हे जखमी झाले असून त्यांच्यावर भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रुग्णालयातही हाणामारी
गणेश मोगरे व पंकज पाटील यांना तक्रार दाखल करण्यापूर्वी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणले असता दोन्ही गट पुन्हा समोरासमोर भिडले. तसेच जखमी युवकांच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात जोरदार राडा करून उपचारासाठी आलेल्या गणेश मोगरे व पंकज पाटील यांना बेदम मारहाण केली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही गटांच्या तरुणांवर गुन्हे दाखल केले.






























































