
विघ्नहर्ता गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आले असून, गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये सध्या लगबग सुरू आहे. गणेशोत्सवाची भाविक आतुरतेने वाट पाहत असताना, भक्तांच्या मनात घर करणारी आकर्षक मूर्ती घडविण्यासाठी मूर्तिकार आणि त्यांचे सहकारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. मातीला आकार देण्यापासून मूर्तीचे बारकावे, रंगकाम, अलंकार आणि अंतिम सजावट करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर मूर्तिकारांकडून कलाकुसरीची पराकाष्ठा केली जात आहे. विशेष म्हणजे या कामात पुरुषांबरोबरच महिलाही खांद्याला खांदा लावून सहभागी होत असून, गणरायाच्या मूर्तीला अंतिम टप्प्यातील रूप देण्यासाठी त्यांचीही मोठी मेहनत सुरू आहे.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी अहिल्यानगरमध्ये विविध आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण रूपांतील गणेशमूर्ती साकारल्या जात आहेत. पारंपरिक रूपांबरोबरच पेशवाई गजमुख, राधाकृष्ण, श्रीकृष्ण, महादेव, चौरंगवाला, सिद्धिविनायक, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा राजा यांसह मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांच्या धर्तीवरील मूतींनाही मागणी आहे. यंदा श्रीरामरूपी गणेश आणि राधाकृष्णरूपी गणेशमूर्तीना विशेष पसंती मिळत असल्याचे मूर्तिकारांकडून सांगण्यात येत आहे. बदलत्या आवडीनुसार भाविक आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या अपेक्षा लक्षात घेऊन मूर्तिकारांकडून विविध संकल्पनांवर काम केले जात आहे. एखाद्या देवतेचे रूप गणरायाच्या रूपाशी कलात्मक पद्धतीने जोडताना मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव, डोळ्यांची रचना, मुकुट, दागिने, वस्त्र आणि हातातील आयुधे यामध्ये अत्यंत बारकाईने काम केले जात आहे.
अहिल्यानगरमधील वरद आर्ट्सचे मूर्तिकार शेखर गोका म्हणाले, की गणेशचतुर्थी हा वर्षातून एकदा येणारा मोठा उत्सव आहे. या उत्सवासाठी आम्ही वर्षभर तयारी करत असतो. दरवर्षी भक्तांचा उत्साह, आवड आणि मूर्तीबाबतच्या अपेक्षा वेगळ्या असतात. त्यामुळे प्रत्येक मूर्ती घडविताना त्यामध्ये केवळ कलाकुसर नव्हे, तर भक्तिभाव निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असतो. भाविकांनी मूर्ती पाहिल्यानंतर त्यांच्या मनात आपलेपणा आणि भक्तीची भावना निर्माण व्हावी, यासाठी प्रत्येक बारकाव्याकडे लक्ष दिले जाते. यंदा अनेक मोठ्या आणि आकर्षक मूर्ती तयार करण्याचे काम सुरू असून, अहिल्यानगरमधील गणेशमूर्ती महाराष्ट्रभर पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. गणरायाच्या सेवेत काम करण्याची संधी मिळणे हीच आमच्यासाठी मोठी आनंदाची आणि समाधानाची बाब आहे.
देशातील विविध भागांतून मागणी
अहिल्यानगर शहरातील गणेशमूर्तीना केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर महाराष्ट्रासह देशातील विविध भागांतून मागणी आहे. हैदराबाद, नाशिक, मुंबई, पुणे, बंगळुरू, गुजरात, सातारा, सोलापूर यांसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून गणेशमूर्तीसाठी मागणी येत आहे. त्यामुळे शहरातील मूर्तिकारांची सध्या कामाची मोठी लगबग सुरू आहे.
बाजारपेठ आणखी गजबजणार
गणेशोत्सव जवळ येत असताना तयार झालेल्या मूर्तीचे रंगकाम आणि सजावटीचे अंतिम टप्प्यातील काम वेगाने सुरू आहे. अनेक मोठ्या आकाराच्या मूर्तीचे कामही कारखान्यांमध्ये सुरू असून, मंडळांच्या संकल्पनेनुसार त्यांची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात अहिल्यानगरमधील गणेशमूर्तीची बाजारपेठ आणखी गजबजणार आहे.
उत्सवाच्या उत्साहात रंग भरायला सुरुवात
एका बाजूला गणरायाच्या आगमनाची भाविकांना उत्सुकता लागली असताना दुसऱ्या बाजूला मूर्तिकारांच्या हातातून आकार घेणाऱ्या गणेशमूर्तीमुळे उत्सवाच्या उत्साहात रंग भरायला हळूहळू सुरुवात झाली आहे. मूर्तिकार आपली कला, कल्पकता आणि भक्तिभाव पणाला लावून गणरायाला साकारत आहेत. येत्या काही दिवसांत रंगकाम, सजावट आणि अंतिम स्वरूपाचे काम पूर्ण झाल्यानंतर या आकर्षक मूर्ती विविध शहरांकडे रवाना होणार असून, त्यानंतर गणेशोत्सवाच्या जल्लोषाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.





























































