
कांदिवली पश्चिमेकडील लिंक रोडवर सोमवारी काही अमराठी रिक्षाचालकांच्या मुजोरीमुळे प्रवासी आणि इतर वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. राज्यात रिक्षा-टॅक्सीचालकांना व्यावहारिक मराठी येणे बंधनकारक केल्याच्या निर्णयाविरोधात रिक्षाचालकांनी रस्त्यावर उतरून गाडय़ा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बेशिस्त आंदोलनाचा रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला.
रिक्षा-टॅक्सीचालकांनी प्रवाशांसोबत मराठीत सभ्यपणे संवाद साधावा, या हेतूने परिवहन खात्याने मराठी सक्तीचा निर्णय घेतला. याला अनुसरून आरटीओकडून सुरू असलेल्या कारवाईला विरोध करीत काही अमराठी रिक्षाचालकांनी सोमवारी कांदिवलीतील लिंक रोडवर गाडय़ा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आंदोलनाचा वाहतुकीवर परिणाम झाला. रिक्षाचालकांच्या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आंदोलकांना रस्त्यावरून बाजूला करीत लिंक रोडवरील वाहतूक पूर्वपदावर आणली.
आंदोलनाला मान्यताप्राप्त संघटनांचा पाठिंबा नाही
रिक्षाचालकांच्या आंदोलनाला मान्यताप्राप्त संघटनांचा पाठिंबा नव्हता. रिक्षाचालकांनी कोणताही संप पुकारलेला नाही असे मुंबई रिक्षामेन्स युनियनचे सरचिटणीस तंबी पुरियन यांनी सांगितले.
मराठी रिक्षाचालकाला मारहाण, चौघे ताब्यात
रिक्षाचालक प्रकाश शेजवळ हे हिंदुस्थान नाक्यावरून रेल्वे स्थानकाच्या दिशेने प्रवासी घेऊन जात होते. क्रोमा शोरूमसमोर त्यांना अमराठी रिक्षाचालकांनी अडवले आणि त्यांच्या रिक्षाचे वायपर तोडत मारहाण करण्यात आली. या मारहाणीविरोधात शेजवळ यांनी तक्रार दाखल केली तसेच घटनेवर सोशल मीडियात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर पोलिसांनी रात्री सुरेश यादव, महेंद्र यादव, अनिल पुमार यादव, नुरुल अन्सारी या चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला.




























































