
हार्बर रेल्वेच्या खारघर स्थानकात लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफमध्ये पक्षी अडकल्यामुळे बुधवारी दुपारी या मार्गावरील संपूर्ण लोकल सेवा विस्कळीत झाली. लोकलच्या छतावर काही वेळ शॉर्टसर्किट सुरू राहिल्याने रेल्वे स्थानकात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या तांत्रिक पथकाने धाव घेतली आणि तातडीने वीजपुरवठा खंडित केला. परिणामी, लोकल सेवा ठप्प होऊन प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली. पेंटाग्राफमध्ये पक्षी अडकून पडल्यामुळे शॉर्टसर्किट झाले आणि मोठ्या प्रमाणावर धूर पसरला. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव लोकल स्थानकात थांबवून ठेवण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (सीएसएमटी) जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या युनिट-३ च्या पेंटाग्राफमध्ये पक्षी अडकल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे सीएसएमटी, पनवेल, ठाणे आणि अंधेरीच्या दिशेने होणारी लोकल वाहतूक ठप्प झाली. परिणामी खारघरसह वाशी, सानपाडा, रबाळे, घणसोली आदी प्रमुख स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. तसेच विविध ठिकाणी थांबवून ठेवलेल्या लोकल गाड्यांमध्ये प्रवासी अडकून पडले. काही गाड्या दोन स्थानकांच्या दरम्यान थांबल्या होत्या. त्या गाड्यांतील प्रवाशांनी पायी चालत जवळचे स्थानक गाठले. पेंटाग्राफमध्ये अडकलेल्या पक्ष्याला बाहेर काढल्यानंतर तांत्रिक तपासणी करून लोकल वाहतूक पूर्वपदावर आणण्यात आली.
सायंकाळपर्यंत गाड्या विलंबानेच
दुपारी जवळपास अर्ध्या तासाच्या गोंधळानंतर लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक सायंकाळपर्यंत विस्कळीतच होते. अनेक गाड्या जवळपास १५ ते २० मिनिटे उशिराने धावल्या.


























































