
>> दिव्या सौदागर
आताची जेन-झी स्वतंत्र वृत्तीची आहे, कुठेही अडकणार नाही तसंच स्वतचा मार्ग स्वत काढणारी आहे. या पिढीशी जुळवून घेण्यासाठी पालकांनी स्वत काही गोष्टी समजून घेणं आणि त्यावर स्वत काम करणं गरजेचं झालं आहे.
आमचा मुलगा हल्ली स्वतला शहाणा समजायला लागला आहे. आहे फक्त 13 वर्षांचा, पण आमच्या नवरा-बायकोमध्ये भरपूर लुडबुड करत असतो. सतत आम्हाला शिकवत असतो, कुठलेही निर्णय पटकन घेतो. आई-बाबाला विचारणं हे नाहीच.” समुपदेशन सत्राला आलेले एक त्रस्त बाबा आपल्या मुलाबद्दल समरच्या (नाव बदलले आहे) पारींचा पाढा वाचत होते. समरचं हे असं अकाली मोठय़ा माणसांसारखं वागणं, त्या दोघांना कायम शिकवणं, त्यांनी सांगितलेल्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास न ठेवणं यामुळे समर आणि त्याच्या आई-वडिलांमध्ये दरी वाढत होती.
समरचे पालक हे उच्चशिक्षित आणि सुखवस्तू होते. समरला त्यांनी अत्यंत लाडाकोडात वाढवलं होतं, पण तरीही तो हट्टी किंवा मिजाशी मुलगा नव्हता. त्याच्या आई-वडिलांबरोबर त्याचं नातं हे मित्रत्वाचं होतं. मात्र गेल्या वर्षभरापासून या नात्याला तडा जायला सुरुवात झाली होती. समर त्याच्या शाळेतल्या मित्राकडे (जो त्याचा जिवलग मित्र झाला होता) जास्तीत जास्त राहू लागला होता. आपलं घर, आई-बाबा आवडेनासे झालेले आहेत अशी त्या दोघांचीही पार होती. क्षुल्लक वाटणारा हा वाद आता समरच्या आई-वडिलांसाठी कळीचा मुद्दा बनला होता.
समरशी बोलताना काही गोष्टी स्पष्ट करून घ्यायच्या होत्या. कारण तो पालकांच्या म्हणण्याप्रमाणे खरोखरच घरी राहायला तयार नसायचा. “मला खरंच आता नाही आवडत आणि आशीषकडे गेल्यापासून तर त्याचं घर मला जास्त आवडायला लागलंय.” समर आता मोकळेपणी बोलायला सुरुवात करत होता. “माझ्या घरी दोघेही आपापल्या कामात नाहीतर मोबाईलमध्ये असतात. माझ्या गप्पा ऐकायला त्यांना एकतर वेळ नसतो किंवा त्या त्यांना महत्त्वाच्या वाटत नाहीत.” असं बोलता बोलता तो एकदम गप्प झाला.
समर सांगत होता, “मला आई-बाबा त्यांचा मुलगा न मानता त्यांच्या बरोबरीचा समजतात. त्यात कधी कधी त्यांचे वादही होतात. आईसारखी मोबाईलवर रील्स बनवत असते जे बाबाला आवडत नाही. त्या दिवशीही ती रील बनवत होती, त्यामुळे जेवणाला उशीर होत होता. बाबा वैतागला. मीही त्याची बाजू घेतली. मी तिला बाबाप्रमाणे रिकामटेकडी असा शब्द वापरला. तेव्हा तिने मला कानाखाली मारलं. मग मला इन्स्लटिंग झालं. मी मग तिचा फोन आपटला. त्या वेळी बाबानेही मला मारलं. त्या दिवसापासून मी त्यांच्याशी बोलणं सोडलं. हे डय़ुअल बोलणं नाही होत का दोघांचं?” समर स्वतची बाजू मांडत होता. समरने त्याच्या पालकांबद्दल वापरलेला डय़ुअल हा शब्द हा बहुधा त्याचा त्यालाच कळला असावा, पण या शब्दामध्ये त्याच्या मनात झालेला गोंधळ त्याच्या पालकांपर्यंत पोहोचलाच नसावा.
आजकाल जेन झी आणि अल्फा मुलांच्या पालकांना त्यांच्याशी कसं वागावं आणि आपण कसं असावं याबाबतीत पालकांमध्येच जो बराच घोळ आहे तो मॉडर्न पॅरेंटिंगच्या संकल्पनेमध्ये बसवताना त्यांची आणि मुलांचीही तारांबळ उडालेली दिसते. त्याचेच उदाहरण म्हणजे समरचे पालक आणि त्यांच्यासारखे बरेचसे पालक. कारण मुलांशी मित्रत्वाने वागायचं की नाही यामध्येही पालकांचा गोंधळ उडालेला दिसतो. आज बऱयाच घरांमध्ये ‘हम दो हमारा एक’ हे पालक-मुलाचे गुणोत्तर आहे. त्यामुळे आपल्या मुलाला ‘बेस्ट पॅरेंटिंग’ देताना आपल्या मूल्यांना आपण बाजूला ठेवतोय का? हेही प्रत्येक पालकाने शोधणं गरजेचं झालं आहे. कारण हल्लीची पिढी ही फक्त विचारायचं म्हणून अरे ला कारे करत नाही, तर तिच्याकडे येणाऱया प्रत्येक प्रश्नावर तिच्या पद्धतीने सोलुशनही काढते आणि त्या प्रश्नातून स्वतला पुढे नेते. त्यात गुंतून पडत नाही.
आजची पिढी ही डोळस आहे. सारासार विवेकाने वागण्याचा प्रयत्नही करते. त्यामुळे काय चूक व काय बरोबर याचा शोध घेताना आपण किंवा आपले आई-वडील कमी नाहीत ना आणि जर असं असेल तर तोडगाही सुचवू पाहते. पण तो तोडगा खिलाडूवृत्तीने स्वीकारायला तिच्या पालकांनी पुढाकार घ्यायला हवा. कारण वर नमूद केल्याप्रमाणे आताची जेन झी स्वतंत्र वृत्तीची आहे, कुठेही अडकणार नाही तसंच स्वतचा मार्ग स्वत काढणारी आहे. या पिढीशी जुळवून घेण्यासाठी पालकांनी स्वत काही गोष्टी समजून घेणं आणि त्यावर स्वत काम करणं गरजेचं झालं आहे. त्यासाठी अर्थातच आत्मपरीक्षण हे महत्त्वाचं आहे. त्यातूनच स्वतच्या मर्यादा स्वतची स्पेस आणि मुख्य म्हणजे स्वतच्या मुलांशी संवाद हा गरजेचा झाला आहे.
समरच आशीषच्या घरी जाणं हे त्याच्या गरजेपोटी होतं. समरला त्याच्या पौगंडावस्थेत येताना मानसिक सुरक्षिततेची गरज होती, जी आशीषच्या पालकांकडून पूर्ण होत होती. त्याला स्वतबद्दल आणि त्याच्या संपर्कात आलेल्या त्याच्या जगाबद्दल असंख्य प्रश्न होते, जे खेळकर संवादातून आशीषच्या पालकांकडून पूर्ण होत होते. त्यामुळे समर तिथे जास्त राहत होता आणि माझ्या पालकांना मी मला वेळ द्यायला कसं सांगू? यातूनच स्वतच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी तो त्यांच्या लक्षात येण्याइतपत बाहेर जात होता आणि तसं सांगू पाहत होता. पण समरच्या पालकांनी त्याच्या या गरजेकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं आणि गैरसमज करून घेतला.
म्हणूनच या केसच्या माध्यमातून जेन झी आणि अल्फा मुलांच्या पालकांना हेच सांगावंसं वाटतं की, आजकाल कितीही माहिती उपलब्ध असली तरी पालक म्हणून स्वतच घडायला हवे अन्यथा कन्फ्युज्ड पॅरेंटिंग उद्भवू शकते.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
[email protected]

























































