
32वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन उद्या रविवारी पार पडणार आहे. प्रशासकीय राजवटीनंतर होणाऱ्या या महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये ठाणेकरांसह राज्यातील जवळपास 25 हजार स्पर्धक धावणार आहेत. मॅरेथॉन यशस्वी आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी महापालिका, पोलीस प्रशासन व सर्व विभाग सज्ज झाले आहेत. मॅरेथॉनचे उद्घाटन सकाळी 6 वाजता होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण यात सहभागी होणार आहे.
स्पर्धेच्या ठिकाणी तसेच स्पर्धा मार्गावर आरोग्य विभागाने 10 डॉक्टरांची पथके, रुग्णवाहिका, ऑन-कॉल वैद्यकीय सेवा तसेच मार्गावरील रुग्णालयांमध्ये राखीव खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच स्वच्छता विभागाने मार्गावरील शौचालये, मोबाईल टॉयलेट्स आणि स्वच्छतेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले असून, शाळा, शिक्षक, बसचालक आणि स्वयंसेवकांशी समन्वय साधण्यात आला आहे. या स्पर्धकांच्या चेस्ट नंबरवर टाईम चिप्स बसवण्यात येणार असल्याने वेळेची अचूक नोंद होणार आहे.


























































