
>> तृप्ती कुलकर्णी
साहित्यप्रेम, सकारात्मकता आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम म्हणजे ई-अभिव्यक्ती हे डिजिटल वेबपोर्टल. असंख्य लेखक-वाचकांना जोडणारे हे समृद्ध साहित्यिक व्यासपीठ आहे.
इंग्लिशमध्ये एक फार सुंदर वाक्य आहे- ‘ब्युटीफुल यंग पिपल आर अॅक्सिडेंटस् ऑफ नेचर, बट ब्युटीफुल ओल्ड पिपल आर वर्क्स ऑफ आर्ट.’ हे वाक्य वाचनात आलं तेव्हा आवडलं होतंच, पण एखाद्याला उद्देशून ते इतकं खरं वाटेल, असं कधी वाटलं नव्हतं. 2022 साली ई-अभिव्यक्ती या वेबपोर्टलशी माझा प्रत्यक्ष संबंध आला आणि या वाक्याची खरी प्रचीती आली. ही जाणीव करून दिली ती ई-अभिव्यक्तीचे सर्वेसर्वा, निर्माते हेमंत बावनकर आणि त्यांच्या संपादकीय सहकाऱयांनी. अनुभव, संवेदनशीलता, साहित्यप्रेम आणि सातत्याने घडत गेलेल्या या समवयस्क ‘ब्युटीफुल ओल्ड पिपल’च्या ‘वर्क्स ऑफ आर्ट’ची- म्हणजेच ई-अभिव्यक्ती या आगळ्यावेगळ्या डिजिटल वेबपोर्टलची (दैनिकाची) ही गोष्ट.
बँकेतून निवृत्त झाल्यानंतर सकारात्मक आणि इतरांनाही आवडेल, जमेल असे काहीतरी करावे, या विचारातून साहित्यप्रेमी हेमंतजींनी 15 ऑक्टोबर 2018 रोजी ई-अभिव्यक्तीची निर्मिती केली. सुरुवातीला यात हिंदी आणि इंग्लिश साहित्याचा समावेश होता. वयाने ज्येष्ठ असलेले, पण आपल्या ज्ञानाचा उपयोग करून लेखन-वाचनातून जीवन समृद्ध करणारे अनेक जण उत्साहाने या उपक्रमाशी जोडले गेले. बदलत्या तंत्रज्ञानाशी अनुभवाची सांगड घालत त्यांची अभिव्यक्ती या माध्यमातून होत राहिली. दोन वर्षांहून अधिक काळ यशस्वी वाटचाल केल्यानंतर 15 ऑगस्ट 2020 रोजी मराठी भाषेचाही यात समावेश झाला. आज या त्रिभाषिक ई-दैनिकाचे नववे वर्ष सुरू असून मराठी विभागाने सहाव्या वर्षात पदार्पण केले आहे. मात्र, केवळ वाढती वर्षे हेच ई-अभिव्यक्तीचे वैशिष्ट्य नसून, त्यापलीकडे जाऊन त्याने अनेकांना दिलेले समृद्ध साहित्यिक व्यासपीठ हे त्याचे खरे महत्त्व आहे.
विशेष म्हणजे हेमंत बावनकर यांनी स्वतच हे डिजिटल वेबपोर्टल डिझाईन केले आहे. रोज ठराविक वेळी तिन्ही भाषांमधील विविध साहित्यप्रकार नियमितपणे प्रकाशित केले जातात. प्रत्येक लेखाची स्वतंत्र लिंक, लेखकाचे नाव आणि छायाचित्र यांसह तो ई-अभिव्यक्तीच्या व्हॉट्सअॅप समूहावर पाठवला जातो. सध्या या दैनिकात मराठीत कवितेचा उत्सव, विविधा, जीवनरंग, मनमंजुषेतून, इंद्रधनुष्य, वाचताना वेचलेले, चित्रकाव्य, काव्यानंद, कथा-लघुकथा, क्षण सृजनाचा, आलेख, संकीर्ण ही सदरे सुरू आहेत. तर हिंदीमध्ये अध्यात्म, आलेख, कथा-कहानी, जीवनयात्रा, यात्रा संस्मरण, योगसाधना, परिचर्चा, रंगमंच, पुस्तक समीक्षा, व्यंग ही सदरे सुरू आहेत आणि इंग्लिशमध्ये आर्टिकल्स, शॉर्ट स्टोरीज, बुक रिह्यू, पोएट्री आणि जर्नी ऑफ लाईफ अशी सदरे सुरू आहेत. व्हॉट्सअॅप समूह थेट चर्चेसाठी खुला नसला, तरी लेखनावरील प्रतिक्रिया संबंधित भाषेच्या संपादकाकडे पाठवल्यास त्या नावासह समूहावर प्रकाशित केल्या जातात. तसेच आवडलेल्या लेखाच्या लिंकवर जाऊन थेट प्रतिक्रियाही नोंदवता येते.
या व्यतिरिक्त ई-अभिव्यक्तीचे वेगळेपण म्हणजे त्याचा दिवाळी विशेषांक. भारतातील आगळ्या डिजिटल उपक्रमांपैकी एक म्हणून हिंदी आणि मराठीतील दिवाळी अंक ‘फ्लिपबुक’ स्वरूपात विनामूल्य प्रकाशित होतो. यासाठी लेखक आणि संपादकांचेही मोठे योगदान आहे. तिन्ही विभागांतील सात संपादक गेली नऊ वर्षे साहित्यप्रेमातून विनामूल्य सेवा देत असून लेखकही विनामानधन लेखन करतात.
हे ई-दैनिक नवोदित आणि प्रस्थापित अशा सर्वांना सामावणारे आहे. कोणत्याही बातम्या, जातीय, राजकीय किंवा धार्मिक लेखनाला स्थान न देता केवळ निखळ साहित्य आणि सकारात्मक विचारांना वाहिलेले हे अपवादात्मक दैनिक आहे. आजवर येथे 35,800 हून अधिक साहित्यकृती प्रकाशित झाल्या असून 8,49,362 हून अधिक लोकांनी या पोर्टलला भेट दिली आहे. विचारांना सकारात्मक आणि प्रभावी अभिव्यक्तीची संधी देणाऱया या उपक्रमाची दखल घेत हेमंत सरांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये झाली असून directory of most popular blogs in india मध्येही ई-अभिव्यक्तीचा समावेश झाला आहे.
ई-अभिव्यक्तीचा प्रवास म्हणजे साहित्यप्रेम, सकारात्मकता आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम. अनुभव आणि तंत्रज्ञानाची सांगड घालत उभे राहिलेले हे व्यासपीठ आज असंख्य लेखक-वाचकांना जोडत आहे. विशेष म्हणजे तरुणांच्याही पसंतीस उतरले आहे. वय सर्जनशीलतेला मर्यादा घालत नाही, हेच ई-अभिव्यक्तीने सिद्ध केले आहे. https://www.e-abhivyakti.com ला इच्छुकांनी जरूर भेट द्यावी.






























































