
दिल्लीत सत्य निकेतन हे वसतिगृह कोसळल्याप्रकरणी इमारतीचा मालक हरिराम बन्सल याला त्याची उर्मिला आणि मुलगा महेश यांना राजस्थानच्या भिवाडी येथून आज अटक केली. या इमारत दुर्घटनेप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकार, महानगरपालिका आणि दिल्ली विद्यापीठाला चांगलेच फटकारले आहे. न्यायालयाने महापालिका, दिल्ली सरकार, केंद्र सरकार, मानवाधिकार आयोग आणि दिल्ली विद्यापीठाला नोटीस बजावून 10 दिवसांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. तर महापालिकेने आज पाच अधिकाऱ्यांना निलंबित केले.
दिल्ली सरकारने आज एका उपायुक्तासह 5 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. दक्षिण झोनचे उपायुक्त राकेश कुमार, अधीक्षक अभियंता रणवीर सिंह, कार्यकारी अभियंता ललितकुमार गोयल, सहाय्यक अभियंता सुनील चौहान आणि कनिष्ठ अभियंता आशीष कुमार यांना शिस्तभंगाची कारवाई प्रलंबित असेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.
उच्च न्यायालयाने सरकार व पालिकेला फटकारले
दिल्ली उच्च न्यायालयात होस्टेलप्रकरणी जनहित याचिका दाखल करण्यात आली. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. त्यावर न्यायालयाने सुनावणी करत सरकार आणि महापालिकेला चांगलेच फटकारले. सरकार जबाबदारी टाळू शकत नाही, असे म्हणत न्यायालयाने संताप व्यक्त केला. याप्रकरणी 25 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
























































