छत्रपती संभाजीनगरात ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांचे जोरदार आंदोलन; अध्यक्ष, सचिवांचा राजीनामा घ्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षामधील कथित गैरप्रकार, पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी पुणे, कोल्हापूर पाठापोठ छत्रपती संभाजीनगरमधील विद्यार्थ्यांनी आज मंगळवार, 8 रोजी क्रांतीचौकात जोरदार धरणे आंदोलन केले. दोन दिवसांत एमपीएससीमधील गैरप्रकार थांबवून अध्यक्ष, सचिवांनी राजीनामा द्यावा नसता तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी यावेळी दिला.

शहरात एमपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी सकाळी 10 वाजता क्रांतीचौकात जमा झाले. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एमपीएससीच्या अध्यक्ष, सचिवांचा राजीनामा घ्या, परीक्षेत पारदर्शकता आलीच पाहिजे, विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणाऱया सरकारचा निषेध असो,  परीक्षा रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांना फीस परतावा द्या, ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी सेंटरची व्यवस्था करावी या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. दोन तास विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन केले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गैरप्रकार झाले असून, लाखो रुपये घेऊन पेपर विकल्या जात आहेत. तसेच पेपर फुटल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. दोन ते तीन वर्षांपासून एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱया विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होत आहे.