
आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण आयुष्यात प्रत्येकालाच कुठेतरी फिरायला जाण्याची इच्छा असते. परंतु, अनेकदा जास्त खर्च होईल या भीतीमुळे अनेक लोक ट्रिपचा प्लॅन रद्द करतात. तुमचा ट्रिपचा बजेट कमी असेल तर प्लॅन कॅन्सल करण्याची अजिबात गरज नाही. आपल्या हिंदुस्थानात अशा अनेक सुंदर जागा आहेत जिथे तुम्ही कमी खर्चात फिरण्याचा उत्तम आनंद घेऊ शकता. या ठिकाणी राहण्यासाठी महागड्या हॉटेल्सऐवजी बजेट हॉटेल्स आणि होमस्टे सहजासहजी मिळतात. तसेच खाण्यापिण्याचा खर्चही खिशाला परवडणारा असतो.
ऋषिकेश (उत्तराखंड)
उत्तराखंडच्या डेहराडून जिल्ह्यात गंगा नदीच्या काठावर वसलेले ऋषिकेश हे एक प्रसिद्ध आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे. कमी बजेटमध्ये फिरण्यासाठी ही अतिशय उत्तम जागा आहे. इथे अनेक बजेट हॉटेल्स, हॉस्टेल्स आणि होमस्टे उपलब्ध आहेत. गंगा नदीच्या काठावर फिरणे, घाटावर वेळ घालवणे आणि जवळपासची ठिकाणे एक्सप्लोर करण्यासाठी फारसा खर्च येत नाही. येथे स्थानिक रेस्टॉरंट्स आणि स्ट्रीट फूड बजेटमध्ये सहज उपलब्ध होते.
वाराणसी (उत्तर प्रदेश)
संस्कृती, मंदिरे आणि घाटांसाठी प्रसिद्ध असलेले वाराणसी हे शहर कमी बजेटमधील पर्यटकांसाठी उत्तम पर्याय आहे. काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग हे येथील मुख्य आकर्षण आहे. इथे राहण्यासाठी अनेक स्वस्त हॉटेल्स आणि धर्मशाळा मिळतात. संध्याकाळची भव्य ‘गंगा आरती’ पाहण्यासाठी आणि घाटांवर फिरण्यासाठी वेगळा खर्च करावा लागत नाही. ऑक्टोबर ते मार्च दरम्यान येथील हवामान अतिशय आल्हाददायक असते. त्यामुळे ही फिरण्याची योग्य वेळ आहे.
जयपूर (राजस्थान)
राजस्थानची राजधानी ‘पिंक सिटी’ जयपूर हे बजेट ट्रॅव्हलसाठी खूप प्रसिद्ध आहे. येथे ऐतिहासिक किल्ले आणि वास्तू हे जयपूरचे मुख्य आकर्षण आहे. शहरात महागड्या हॉटेल्ससोबतच अनेक बजेट हॉटेल्स आणि हॉस्टेल्स उपलब्ध आहेत.जयपूरमध्ये हवा महलच्या आसपास फिरणे, स्थानिक बाजारपेठा एक्सप्लोर करणे, आमेर फोर्ट आणि नाहरगड फोर्टला भेट देणे हे कमी खर्चात शक्य होते.
पुष्कर (राजस्थान)
पुष्कर हे धार्मिक महत्त्व आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. इथे देशातील एकमेव भगवान ब्रह्मदेवाचे मंदिर इथे आहे. याशिवाय पवित्र पुष्कर तलाव आणि पंचकुंड खूप प्रसिद्ध आहेत. इथे राहण्यासाठी बजेट हॉटेल्स आणि गेस्ट हाऊस सहज मिळतात. येथील लहान कॅफे आणि स्थानिक रेस्टॉरंट्समध्ये स्वस्त दरात उत्तम जेवण मिळते.
हम्पी (कर्नाटक)
इतिहास आणि प्राचीन वास्तुकलेची आवड असणाऱ्यांसाठी हम्पी हे अत्यंत खास ठिकाण आहे. विजयनगर साम्राज्याची ही प्राचीन राजधानी होती. इथे विरुपाक्ष मंदिर, विठ्ठल मंदिर, स्टोन चॅरियट (दगडी रथ) आणि हेमकूट हिल्स ही प्रमुख आकर्षणे आहेत. इथे बजेट गेस्ट हाऊस, होमस्टे आणि स्थानिक जेवणाचे अनेक परवडणारे पर्याय उपलब्ध आहेत.
कम बजेटमध्ये ट्रिप प्लॅन करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा:
- महागड्या हॉटेल्सऐवजी हॉस्टेल्स, होमस्टे किंवा बजेट गेस्ट हाऊसला प्राधान्य द्या.
- ट्रॅव्हलचा खर्च वाचवण्यासाठी टॅक्सीऐवजी लोकल ट्रान्सपोर्टचा (बस, ऑटो) वापर करा.
- मोठ्या कॅफे आणि रेस्टॉरंट्सऐवजी स्थानिक ढाबे आणि लहान हॉटेल्समध्ये जेवणे फायदेशीर ठरते.
- शक्य असल्यास वीकेंड किंवा ‘पीक सीझन’ वगळून सामान्य दिवसांत ट्रिप प्लॅन करा, यामुळे हॉटेल आणि प्रवासाचे दर खूप कमी असतात.
- निघण्यापूर्वी हॉटेल्स आणि प्रवासाच्या दरांची ऑनलाइन माहिती नक्की करा.

























































