
पवईच्या वॉर्ड क्रमांक १२२ मधील फॉरेस्ट गार्डनमधून बिल्डरसाठी डीपी रोड बनवण्याचा घाट महापालिकेने घातला आहे. या डीपी रोडसाठी फॉरेस्ट गार्डनमधील शेकडो झाडांची कत्तल केली जाणार असून त्याविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. ही झाडे वाचवण्यासाठी शनिवारी १२ सप्टेंबर रोजी शिवसेना सुरक्षा बंधन आंदोलन करणार आहे.
पवईतील प्रमोद महाजन महापालिका उद्यान हे ‘फॉरेस्ट गार्डन’ या नावाने प्रसिद्ध आहे. या मैदानाजवळच हिरानंदानी निवासी संकुलात जीसीसी प्रकल्प राबवला जाणार आहे. या प्रकल्पाला पवईवासीयांचा विरोध आहे. मात्र तरीही प्रशासन या प्रकल्पासाठी ‘इन ॲक्शन’ झाले आहे. या जीसीसी प्रकल्पात जाण्यासाठी नवा डीपी रोड प्रस्तावित करण्यात आला असून तो फॉरेस्ट गार्डनच्या जागेतून जाणार आहे. त्यासाठी सर्व्हे खात्याने डिमार्केशनही पूर्ण केले आहे. तसेच त्यांनी तसा रिपोर्ट उद्यान विभागाला सादर केला आहे. या डीपी रोडसाठी फॉरेस्ट गार्डनमधील किती झाडे कापावी लागणार याचाही अहवाल तयार करून तो डीपी विभागाला पाठवण्यात येणार आहे.
डीपी रोड तयार करण्यासाठी उद्यानातील शेकडो झाडांची कत्तल होणार असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास व पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होणार आहे. त्यामुळेच या डीपी रोडला शिवसेनेचे विक्रोळी विधानसभेचे उपविभागप्रमुख निलेश साळुंखे यांनी कडाडून विरोध केला आहे. स्थानिक नागरिकांनीही या जीसीसी प्रकल्पालाच विरोध केल्याने शेकडो झाडे वाचवण्यासाठी शिवसेना शनिवारी १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुरक्षा बंधन आंदोलन करणार आहे. पवईवासीयांनी शनिवारी सायंकाळी पाच वाजता फॉरेस्ट गार्डन येथे उपस्थित राहावे, असे आवाहन निलेश साळुंखे यांनी केले आहे.





























































