
गणपती बाप्पा मोरया.. च्या गजरात सोमवारी मोठ्या जल्लोषामध्ये विघ्नहर्त्यांचे आगमन होत आहे. त्यासाठी चौकाचौकात भव्य मिरवणुका निघतील. मात्र या मिरवणुकांमध्ये ठिकठिकाणी उभारलेली महाकाय होर्डिंग्ज अडचणीची ठरण्याची शक्तता आहे. कारण ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या ८९५ बेकायदा होर्डिंग्जची दहशत निर्माण झाली आहे. सुरक्षेचे नियम धाब्यावर जाहिरात कंपन्यांना प्रशासनाने परवानगी दिली असून घाटकोपरसारखी एखादी दुर्घटना घडल्यानंतर पालिकेला जाग येणार काय, असा संतप्त सवाल ठाणेकरांनी केला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या दीड हजाराहून अधिक होर्डिंग्ज उभारण्यात आली आहेत. त्यापैकी फक्त ६०५ होर्डिंग्जनाच परवानगी देण्यात आली आहे. आश्चर्य म्हणजे ज्या मोठ्या कंपन्यांना अधिकृत परवानगी मिळाली त्यांनीच प्रमाणापेक्षा जास्त आकाराचे महाकाय होर्डिंग्ज ठाण्यात ठिकठिकाणी उभारले आहेत. १३ मे २०२४ रोजी घाटकोपरमध्ये जोरदार वारा व अवकाळी पावसाच्या माऱ्यामुळे भलेमोठे होर्डिंग्ज कोसळून १७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेत ७५ जण जखमीही झाले होते.
नागरिकांचा जीव धोक्यात का घालता?
ठाणे महापालिकेला अधिकृत होर्डिंग्जच्या माध्यमातून १९ कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र ८९५ बेकायदा होर्डिंग्ज लावणाऱ्या कंपन्या पालिकेचा महसूल बुडवत आहेत. कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवण्यासाठी नागरिकांचा जीव तुम्ही धोक्यात का घालता, असा सवाल विचारला जात आहे.
- ठाणे शहर झपाट्याने वाढत असून माजिवडा, तीन हात नाका, कॅडबरी जंक्शन तसेच घोडबंदर रोडवर मोठ्या आकाराची होर्डिंग्ज दिसून येतात.
- भल्यामोठ्या या होर्डिंग्जना परवानगी मिळालीच कशी? घाटकोपरसारखी दुर्घटना घडण्याची वाट पाहात आहात काय, असा प्रश्न जागरूक नागरिकांनी विचारला आहे.
- होर्डिंग्ससंदर्भात पालिका व वाहतूक विभागाची नियमावली आहे. मात्र या नियमावलीकडे सपशेल दुर्लक्ष करून राजरोसपणे मोठ्या आकाराचे होर्डिंग्ज उभारले आहेत.
तर मुख्यालयासमोरच उपोषण
ठाणे महापालिकेने शहरातील होर्डिंग्जचे ऑडिट करावे व बेकायदा होर्डिंग्ज त्वरित हटवावेत अन्यथ आपण मुख्यालयाबाहेर उपोषण करू, असा इशारा काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिला आहे. बेकायदा होर्डिंग्जकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करा, अशी मागणीदेखील त्यांनी केली.





























































