मध्य रेल्वे पुन्हा कोलमडली; साडेतीन तास लोकल एकाच जागी, गोंधळाने घेतला तीन प्रवाशांचा बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेवरील लोकल सेवेचे वेळापत्रक सोमवारी संपूर्ण दिवसभर विस्कळीत राहिले. सकाळी 9.30च्या सुमारास ठाणे ते मुलुंडदरम्यान ओव्हरहेड वायरवर तार पडली. त्यापाठोपाठ कांजुरमार्ग स्थानकावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि विक्रोळी ते भांडुपदरम्यानच्या मार्गावरील सर्व सिग्नल बंद पडले. त्याचा मोठा परिणाम लोकल सेवेवर झाला. ऐन पीक अवर्सला तब्बल साडेतीन तास लोकल एकाच जागी ठप्प झाल्या. त्यामुळे लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी खाली उतरून भरउन्हातून रुळावर पायपीट करावी लागली. दिवसभर लाखो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, या गोंधळामुळे झालेल्या दोन दुर्घटनांमध्ये तीन प्रवाशांचा बळी गेला.

लोकल गाडय़ांचा विलंब नित्याचाच झाला आहे, मात्र सोमवारी आठवडय़ाच्या  पहिल्याच दिवशी सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे नोकरदारांचे प्रचंड हाल झाले. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास कांजुरमार्ग स्थानकाजवळील सीटीसी रेटमध्ये आग लागली. त्या आगीचा परिणाम होऊन भांडुप ते विक्रोळीदरम्यानचे सिग्नल बंद पडले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि कल्याण अशा दोन्ही दिशेने जाणाऱ्या लोकल जागोजागी तब्बल साडेतीन तास ठप्प झाल्या. गाडय़ांच्या एकापाठोपाठ एक रांगा लागल्या. बराच वेळ गाडीमध्ये कोणतीही उद्घोषणा केली जात नव्हती हे पाहून प्रवाशांनी मधेच रुळावर उतरून जीव धोक्यात घालून पायपीट सुरू केली. यात वृद्ध नागरिक, महिला, दिव्यांग प्रवासी आणि लहान मुलांचाही समावेश होता. काहींना उन्हात चालत असताना चक्कर येण्याच्याही घटना घडल्या.

रेल्वेच्या गोंधळात तिघांचा बळी

रेल्वेच्या गोंधळात सायंकाळी भांडुप आणि घाटकोपर येथे वेगवेगळ्या लोकल गाडय़ांच्या धडकेत तिघांचा बळी गेला. भांडुप स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. 4 वरून प्लॅटफॉर्म क्र. 2 वरील गाडी पकडण्याच्या प्रयत्नात मुलुंड येथील साहिल थिटे या 21 वर्षीय तरुणाचा एसी लोकलच्या धडकेत मृत्यू झाला, तर घाटकोपर आणि विक्रोळीदरम्यान डाऊन जलद गाडीने दोघांना उडवले. त्या दोन्ही जखमी प्रवाशांना राजावाडी रुग्णालयात नेले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

15 मिनिटांच्या प्रवासाला अडीच तास

ठाणे ते घाटकोपरपर्यंतच्या अवघ्या 15 मिनिटांच्या प्रवासात तब्बल अडीच तास खर्ची गेल्याचे नियमित प्रवासी दर्शन पाटील यांनी सांगितले. अंबरनाथ येथून सकाळी 11च्या सुमारास गाडीत बसलेले प्रवासी सीएसएमटी स्थानकावर अडीच वाजता पोहोचले. याचदरम्यान जलद गाडय़ा भायखळा येथून धिम्या मार्गावरून चालवल्या गेल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला.

टप्प्याटप्प्याने सिग्नल यंत्रणा पूर्ववत

अप आणि डाऊन मार्गांवरील सिग्नल यंत्रणा सायंकाळपर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आली. डाऊन जलद मार्गावर 4.10 वाजता, अप जलद मार्गावर 4.46 वाजता, डाऊन धिम्या मार्गावर 5.30 वाजता आणि अप धिम्या मार्गावर सायंकाळी 6.18 वाजता सिग्नल प्रणाली पूर्ववत झाल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्प अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी दिली.

सिग्नल बंद पडल्यामुळे झाला घात

सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्यास बराच वेळ लागला. या काळात सीएसएमटी ते कल्याणपर्यंतच्या सर्वच लोकल गाडय़ा तब्बल अडीच ते तीन तास विलंबाने धावल्या. सिग्नल बंद पडल्यामुळे रेल्वेकडून ‘अॅब्सोल्युट ब्लॉक वार्ंकग’ प्रणाली लागू करण्यात आली. मोटरमनना ‘पुढे पहा आणि गाडय़ा चालवा’ अशा पद्धतीने गाडय़ा चालवाव्या लागल्या. यावेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक भागांत झेंडे दाखवून गाडय़ा पुढे नेण्यात आल्या. त्यामुळे गाडय़ांचा वेग मंदावल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

कॅबचालकांकडून लूट

लोकल प्रवाशांच्या गैरसोयीचा कॅबचालकांनी गैरफायदा उठवला. अनेक नोकरदारांनी लोकल गोंधळात अडकण्याऐवजी कॅबचा पर्याय निवडला. मात्र त्यांना कॅबच्या अवाजवी भाडय़ाचा भुर्दंड सोसावा लागला. ठाणे ते सीएसएमटी प्रवासासाठी 900 रुपये तर ठाण्याहून परळला जाण्यासाठी 800 रुपये मोजावे लागले.

हार्बरही बोंबलली

मध्य रेल्वेच्या मेन लाइनप्रमाणेच हार्बरची सेवा संध्याकाळच्या सुमारास विस्कळीत झाली. अप आणि डाऊनच्या दिशेने जाणाऱ्या सर्वच लोकल गाडय़ांना जवळपास तासभराचा विलंब झाला. वाशीला जाणारी 3.54 वाजताची लोकल आणि वांद्रे येथे जाणारी 4.04 वाजताची लोकल 4 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास रवाना झाल्या.