
पालघर जिह्यात वाढवण बंदराबरोबरच चौथी मुंबई, केमिकल झोन, रिफायनरी, महामार्ग यांसारखे असंख्य विनाशकारी प्रकल्प राज्य व केंद्र सरकार भूमिपुत्रांच्या माथी मारत आहेत. त्याविरोधात आज वरोरमधील प्रचंड सभेत भूमिपुत्रांचा जबरदस्त महाजनआक्रोश दिसून आला. हजारो शेतकरी व मच्छीमारांना उद्ध्वस्त करणारे हे सर्व प्रकल्प पालघर जिह्यातून तत्काळ हद्दपार करा अशी मागणी शिवसेनेसह सर्व राजकीय पक्ष आणि विविध संघटनांनी आज केली. या प्रकल्पाविरोधात लढा पेटला असून तो अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच हे प्रकल्प पालघर जिह्यात आणण्यासाठी बडय़ा उद्योगपतींना मदत करणाऱ्या सरकारच्या दलालांना फटकवून काढा, असा हल्ला शिवसेना नेते व आमदार अंबादास दानवे यांनी केला.
पालघर जिल्हा विनाशकारी प्रकल्पविरोधी संघर्ष समितीच्या वतीने वरोर येथे ही जनआक्रोश सभा आज पार पडली. या सभेसाठी जिह्याच्या विविध भागांतून हजारोंच्या संख्येने भूमिपुत्र उपस्थित होते. एकच जिद्द… वाढवण बंदर रद्द…, एक-दो एक-दो विनाशकारी प्रकल्प फेक दो.., अशा असंख्य घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. विनाशकारी प्रकल्पांविरोधात वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, नॅशनल फिशवर्कर्स फोरम, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ, पालघर,ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी संघ मर्यादित, भूमीसेना-आदिवासी एकता परिषद यांसह 52 संघटनांनी एल्गार पुकारला आहे.
वरोरमधील महाजनआक्रोश सभेला शिवसेना संपर्कप्रमुख विलास पोतनीस, सहसंपर्कप्रमुख विकास मोरे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, माजी खासदार बळीराम जाधव, माजी आमदार हितेंद्र ठाकूर, सुनील भुसारा, राजेश पाटील, कपिल पाटील, गिरीश राऊत, ओमकार पाटील, अनुप पाटील, डॉ.विश्वास वळवी, काँग्रेस जिल्हाप्रमुख सत्यम ठाकूर, रामपृष्ण तांडेल, वैभव वझे, स्वप्नील तरे, विनीत पाटील, मानेंद्र आरेकर, दीपक राऊत आदी उपस्थित होते.
विकासाच्या नावाखाली प्रकल्प लादू नका
आज सकाळपासूनच या जनआक्रोश सभेसाठी वरोर गावात जिह्याच्या विविध भागांतून आंदोलनकर्ते आले होते. या सभेला मार्गदर्शन करताना शिवसेना नेते व आमदार अंबादास दानवे यांनी सरकारवर टीकेची जबरदस्त झोड उठवली. ते म्हणाले की, विकासाच्या नावाखाली पालघरमध्ये सरकार प्रकल्प आणून येथील भूमिपुत्रांना देशोधडीला लावत आहे. त्यामुळे जमिनी आणि रोजगारांवर गदा येणार असून नैसर्गिक साधनसंपत्तीचादेखील ऱहास होणार आहे. विकासाच्या नावाखाली प्रकल्प लादू नका. आपल्यातलेच काही दलाल अदानी, अंबानी आणि जिंदाल यांसारख्या उद्योगपतींना मदत करीत आहेत. त्यामुळे अशा भांडवलदारांचे फावते. त्यांच्यासाठी काम करणाऱ्या सरकारी दलालांना पहिल्यांदा फटकवा, असे आवाहन दानवे यांनी केले.
… तर देशातील आंदोलकांनाही बळ मिळेल
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीदेखील आपल्या भाषणात सरकारवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात जल, जंगल, जमीन, शिक्षण आणि आरोग्य यांसाठी साडेतीन हजार आंदोलने सुरू आहेत. ही आंदोलने वेगवेगळी असली तरी त्यामागील शत्रू एकच आहे. वाढवणचा लढा भूमिपुत्रांनी जिंकला तर देशभरातील 36 हजार आंदोलकांनाही मोठे बळ मिळेल असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले. वाढवण बंदर हे 56 इंचवाल्यांचे असून त्यांचा प्रभाव कमी झाला तर ते बंदरच रद्द होईल, असाही टोला त्यांनी लगावला.
एकजुटीने संघर्ष करा
या जाहीर सभेत बोलताना शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी चौथी मुंबई, केमिकल झोन, रिफायनरी अशा विनाशकारी प्रकल्पांविरोधात एकजुटीने संघर्ष करा आणि हे सर्व प्रकल्प रद्द करण्यासाठी सरकारवर दबाव टाका, असे आवाहन केले. माकपचे आमदार विनोद निकोले यांनीही वाढवण बंदर रद्द होईपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचे सांगितले. या सभेत वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील, युवा संघर्ष समितीचे मिलिंद राऊत, कष्टकरी संघटनेते ब्रायन लोबो आदींची भाषणे झाली.
वाढवण बंदर प्रकल्पाविरोधात सर्वपक्षीय आणि वाढवण बंदर विरोधी पृती समितीच्या वतीने जनआक्रोश मोर्चा आयोजित केला होता. एकच जिद्द… वाढवण बंदर रद्द…अशा असंख्य घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.





























































