विज्ञान रंजन – माणसाची ‘उंची’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमक्या तमक्याचा मुलगा किंवा मुलगी चांगलीच उंच आहे, असं साधारणपणे तरुणांची लग्ने ठरतात, त्यावेळी कानी पडतं. जगभरच पुरुषांची उंची महिलांपेक्षा थोडी जास्त असते. विवाह ठरवताना या सगळ्याची चर्चा होते. मध्यंतरी अशीच चर्चा कानावर आली आणि एकूणच माणसाच्या ‘उंची’बद्दलचं कुतूहल जागं झालं. आमची 1950 च्या दशकातली (हल्लीच्या भाषेत बेबी बूमर) पिढी पुढच्या पिढय़ांच्या तुलनेत ‘बुटकी’ दिसते. सरासरी उंची साडेपाच फुटांची. त्याकाळी ही उंचीही ‘बरीच’ मानली जायची. मात्र पुढच्या साठ, सत्तर आणि आता 2000 नंतर जन्मलेल्या मुलामुलींची उंची खूपच वाढलेली आढळते. यावर ‘गुगल’वर जाऊन जरा माहिती घेतली, तेव्हा मानवी उंचीबद्दलच्या विज्ञानाला ‘ऑक्झॉलॉजी’ म्हणतात असं समजलं. हल्ली प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करण्याचा ध्यास घेतलेले अनेक असतात आणि त्यांच्या अभ्यास शाखांची नवनवी नावंही जन्माला येतात. ग्रीक ‘ऑक्झो’ शब्दाचा अर्थ ‘वाढ होणे’ असा आहे. ‘लॉजी’ म्हणजे त्या विषयाचा अभ्यास. ‘जसं पॅथॉलोजी, बायोलॉजी तशीच ऑक्झॉलॉजी.

आमच्या जगात तुर्कस्तानातील सुलतान कोसेन हा 1982 मध्ये जन्मलेला तरुण जगात सर्वात उंच गणला जातो. त्याची उंची 8 फूट 3 इंच आहे! अर्थात त्याच्यासारखी व्यक्ती ही अपवाद असते. एरवी सहा फूट उंचीचा पुरुष आणि पावणेसहा फूट उंचीची स्त्री ‘उंच’ समजले जातात. आपल्या देशातली सर्वसाधारण उंची 5 फूट 7 इंच वगैरे आहे. परंतु गेल्या काही वर्षांत विशेषतः मिलेनियम जेन-झी वगैरे पिढय़ांमधली मुलं आमच्यासारख्या मागच्या पिढय़ांपेक्षा बरीच उंच दिसतात. आमच्या आधीच्या पिढय़ांमध्ये तर बहुतेक वेळा पुरुषांची उंची 5 फूट 2 इंच आणि स्त्री जेमतेम 5 फूट असायच्या. काही माणसं तर त्याहून बुटकी.

मग जगात एकूणच उंच वाढण्याची ‘साथ’ आली कधी? अशी ‘साथ’ वगैरे काही येत नसते. मात्र त्यामागे अनेक वैज्ञानिक कारणं दडलेली असतात.

आपल्याकडे जशी तीन-चार पिढय़ांपूर्वीची माणसं आजच्या नव्या पिढय़ांच्या तुलनेत बुटकी होती. तशीच परिस्थिती संपूर्ण आशियात होती. आमच्या लहानपणी मुंबईतही काही चिनी माणसं दिसायची. ती इथेच राहणारी व्यावसायिक. मात्र त्यांची उंची खूपच कमी. तीच गत जपान्यांचीही होती. आता मात्र तिथल्याही सध्याच्या पिढीची उंची खूपच जास्त आहे.

जन्मताना एखाद्या बाळाची प्रकृती कशी असते ते त्याच्या आईच्या प्रकृतीवरूनही ठरतं. गर्भारपणात तिचा सकस आहार आणि सभोवती प्रसन्न वातावरण लाभलं असेल तर मूलही सुदृढ जन्माला येतं. अर्थात ही एकच गोष्ट नंतर त्या व्यक्तीची उंची ठरवायला कारणीभूत नसते, पण महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे लहान मुलालासुद्धा वाढीच्या वयात चौरस आहार आणि आरोग्यदायी वातावरण लाभलं तर त्याच्या वाढीवर चांगला परिणाम होतो. माणसाची उंची जन्मल्यापासून पहिल्या दोन वर्षांत वेगाने वाढते. नंतर हा वेग मंदावतो.

त्यानंतर वयात येणाऱ्या काळात म्हणजे 12 ते 14 वर्षांच्या वयात मुला-मुलींच्या उंचीत एकदम वाढ झाल्याचं भोवतीच्या लोकांनाही जाणवतं. बालवयात बारीक असलेली मुलं, तारुण्याच्या उंबरठय़ावर सशक्त आणि उंच होताना आढळतात. त्यातही घरातली समृद्धी किंवा सुखवस्तुपणा, ताण-तणाव नसणे, योग्य आहार आणि प्रगतीच्या योग्य संधी या साऱ्या व्यक्ती विकासासाठी आवश्यक असणाऱया पूरक गोष्टी वेळीच लाभल्या तर त्याचा परिणाम ‘उंची’वरही होतोच.

याचं उत्तम उदाहरण म्हणजे दुसऱया महायुद्धानंतरच्या काळात अनेक विकसनशील देशात हळूहळू का होईना, पण प्रगती झाली. सभोवतालच्या वातावरणात मोकळेपणा आला. याचा परिणाम जगातल्या सर्वच आणि त्यातही आशियाई देशांवर अधिक झाला. त्यामुळे ‘बुटक्या’ चिनी-जपान्यांची उंची ‘पोस्ट-वॉर’ म्हणजे 1945 ते 50 नंतर जन्माला आलेल्या पिढय़ांमध्ये वेगाने वाढताना दिसली. आता आशियाई तरुणवर्ग आणि युरोपीय किंवा अमेरिकन हे अनेक वर्षे सुबत्ता अनुभवणाऱ्या देशातील तरुणवर्ग यांच्या उंचीत फारसा फरक दिसत नाही.

साधारण कोणत्याही माणसाची उंची 18 व्या वर्षी ‘पूर्ण’ होऊन स्थिरावते. त्यानंतरच्या दोन वर्षांत झाली तर थोडीशीच वाढ दिसते. या सगळ्या ‘ठोकताळ्यां’ना अपवाद आढळतातच. पण त्याने सरासरीचा नियमच सिद्ध होतो. त्यामुळे सध्या जगातील तरुणांची सरासरी उंची 5 फूट 5 इंच आहे. मग त्यात काही सहा फूट किंवा थोडय़ा अधिक उंचीचेही येतात. अर्थात युरोप-अमेरिकेत किंवा पाश्चात्त देशातले तरुण बरेच उंच दिसतात. कारण महायुद्धांचा काळ वगळला तर आधुनिक विज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधा त्यांच्याकडे गेली किमान दीडशे वर्षे तरी आहेत. हाच सभोवतालजन्य परिणाम. आता आशियाई तरुणाईसुद्धा सरासरी 5 फूट 9 इंच उंचीपर्यंत पोचत आहे. या साऱ्याचा अर्थ बुटकेपणात उणेपणा आहे असा अजिबात घेऊ नका. चार्ली चॅप्लिनपासून गांधीजी आणि शास्त्र्ााrजींची शारीरिक उंची खूप नव्हती. परंतु त्यांचं कर्तृत्व आभाळाला भिडणारं ठरलं हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे कर्तृत्वाची उंची फूट-इंचात मोजता येत नसते!

विनायक