शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला जाब विचारणार! शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लवकरच मुंबईत मोर्चा, आदित्य ठाकरे यांची घोषणा, वैजापूर, कन्नडमध्ये दुष्काळ पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात भयंकर दुष्काळ आहे. 265 तालुक्यांमध्ये पावसाअभावी शेतशिवारावर मरणकळा आली आहे. शेतकरी मदतीसाठी आक्रोश करत असताना सरकारला मात्र त्यांच्याकडे बघण्यास वेळ नाही. केंद्रापासून ग्रामपंचायतीपर्यंत आसुरी बहुमत असतानाही शेतकऱ्यांना न्याय देण्यात काय अडचण आहे? असा संतप्त सवाल शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी लवकरच मुंबईत मोर्चा काढणार असल्याची घोषणाही यावेळी त्यांनी केली.

वैजापूर तालुक्यातील गारज आणि कन्नड तालुक्यातील औराळा येथे प्रत्यक्ष बांधावर जाऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, उपनेते सुभाष पाटील, माजी आमदार उदयसिंह राजपूत, जि.प. सदस्य संजय निकम, कल्याण चव्हाण, तालुकाप्रमुख मनाजी मिसाळ, संजय मोटे, युवासेनेचे उपसचिव धर्मराज दानवे, जिल्हा युवा अधिकारी विठ्ठल डमाळे, उमेश मोकासे आदी होते.