सामना अग्रलेख – कृष्णाने ‘माखन’ चोरले, यांनी ‘गोकुळ’ लुटले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात सध्या निवडणुकीच्या खेळाचा नियम बदलला आहे. पराभूतांनाच विजयी घोषित केले जात आहे. हीच मोदी, शहा, फडणवीसांची लोकशाही आहे. ‘ईडी’च्या धाडी ज्यांच्यावर पडल्या ते हसन मुश्रीफ हे भाजपच्या तंबूत शिरले व आता त्यांना ‘ईडी’ने सरळ क्लीन चिट दिली. गोकुळच्या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव पराभूत झाले तरी त्या पडेल पहेलवानाचा हात उंच करून फडणवीस यांनी त्यांना विजयी घोषित केले. हा आज रडीचा डाव असला तरी तो फक्त दोन घडीचाच डाव आहे. हा डाव जनता उधळून लावेल!

श्रीकृष्ण हा गोकुळात माखनचोर म्हणून प्रसिद्ध होता. ‘माखनचोर’ हे श्रीकृष्णाचे त्याच्या बालपणातले सर्वात गोड नाव आहे. गोकुळ वृंदावनात नंद आणि यशोदामाईसोबत मोठा होताना कान्हा असलेला श्रीकृष्ण माखन म्हणजे लोणी चोरी करायचा. गोपींनी लोण्याचे मटके उंच टांगले तरी मित्रांच्या खांद्यावर चढून तो मटकी फोडत असे व दही-दूध-लोणी खात असे. श्रीकृष्णाने फक्त माखन चोरले, पण आताच्या भाजपच्या भामटय़ांनी संपूर्ण ‘गोकुळ’वरच दरोडा टाकला आहे. या दरोड्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात खळबळ उडाली आहे. कोल्हापूरच्या गोकुळ दूध उत्पादक संघातील सत्तेचे माखन ओरबाडण्यासाठी त्या संघावर तज्ञ संचालक नेमण्याची झुंडशाही सुरू केली आहे. मोदी, शहा, फडणवीस यांना लोकांचा कौल मान्य नाही. लोकशाही मार्गाने दूध संघावर निवडून आलेल्या बहुमताच्या पॅनलला सत्तेपासून रोखण्यासाठी नव्या क्लृप्त्या राज्यातील सत्ताधाऱ्यांनी सुरू केल्या आहेत. गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीला 13, तर हसन मुश्रीफ यांच्या महायुतीला 12 जागा मिळाल्या. खरे तर समविचारी आघाडीला 15 जागांवर विजय मिळाला असताना ‘वर’चा हस्तक्षेप घडवून शेवटच्या क्षणी निर्णय फिरवून दोन जागा चोरण्यात आल्या. शौमिका महाडिक, नावेद मुश्रीफ वगैरे प्रमुख लोकांचा पराभव झाला. फडणवीस, मुश्रीफ, महाडिक वगैरे लोकांनी इतकी

खेचाखेची करूनही

सतेज पाटील हे 13 जागा जिंकले. आता बारा आणि तेरा यातले बहुमत कोणाचे हे कळून न कळल्यासारखे करणाऱ्यांनी ‘13’चे बहुमत नाकारले. नियमानुसार चौदा पाहिजे, नाहीतर आम्ही आमचे पाच-सहा लोक निवडणुकीशिवाय संचालक म्हणून गोकुळ दूध संघावर घुसवतो असे सांगून फडणवीस मंत्रिमंडळाने कॅबिनेटमध्ये तशा प्रस्तावास मान्यता दिली. एका बाजूला अमित शहा, फडणवीस वगैरे लोक स्वतःचे सरकार असतानाही ‘लोकशाही रक्षणार्थ’ मोर्चे काढत आहेत, म्हणजे स्वतःच स्वतःविरुद्ध मोर्चे काढत सुटले आहेत आणि त्याच वेळी ‘गोकुळ’मध्ये सदस्यांनी निवडून दिलेले बहुमत नाकारून त्या ठिकाणी स्वतःची सत्ता जबरदस्तीने लादत आहेत. लोकांनी आम्हाला हरवले तरी आम्ही सत्ता सोडणार नाही हा त्यांचा हट्ट आहे. 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका हे लोक हरलेच होते, पण ज्ञानेश कुमारच्या सहकार्याने ते सत्तेवर आले हा संशय आता खरा ठरला आहे. एका गोकुळ संघातील विरोधकांचा विजय ते स्वीकारत नाहीत. कोल्हापूरच्या साडेपाच लाख दूध उत्पादक सदस्यांनी गोकुळ दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत दिलेला हा कौल आहे. 25 पैकी 13 जागा जिंकलेल्या गटाला त्यांचा अध्यक्ष नेमण्याचा अधिकार आहे. हा अधिकार नाकारणारे सरकार लोकशाहीद्रोही आहे. फडणवीस यांनी पराभूत ‘12’वाल्यांचे 16 करण्यासाठी नियम बदलले.

बहुमत हिसकावून घेण्याचा

हाप्रयत्न घृणास्पद आहे. भाजपचे मानसिक संतुलन बिघडले आहे. सत्तेसाठी ते इतके लाचार व हिंसक झाले आहेत की, एका दूध संघातला पराभवही ते पचवू शकत नाहीत. गोकुळ दूध संघावर चार अशासकीय संचालक नेमून बहुमत फिरवण्याचा निर्णय कायद्याच्या कसोटीला उतरणार नाही. फडणवीसप्रेमी माजी ‘सुप्रीम’ सरन्यायाधीश भूषण गवई यांनी हा निर्वाळा दिला आहे. गोकुळची सत्ता काबीज करण्यासाठी फडणवीस यांनी कायद्यात दुरुस्ती केली, पण या निर्णयातून जिल्हा बँका आणि सहकारी साखर कारखान्यांना वगळण्यात आले. म्हणजे कोल्हापूरच्या जनतेने ज्यांना पराभूत करून घरी बसवले अशा नावेद मुश्रीफ, शौमिका महाडिकसारख्यांना पुन्हा संचालक मंडळात आणण्याचा हा खटाटोप आहे. सरकारने आता एक जाहीर करावे ते म्हणजे यापुढे ‘लोकशाही’तला बहुमताचा विजय मान्य होणार नाही. देशात सध्या निवडणुकीच्या खेळाचा नियम बदलला आहे. पराभूतांनाच विजयी घोषित केले जात आहे. हीच मोदी, शहा, फडणवीसांची लोकशाही आहे. ‘ईडी’च्या धाडी ज्यांच्यावर पडल्या ते हसन मुश्रीफ हे भाजपच्या तंबूत शिरले व आता त्यांना ‘ईडी’ने सरळ क्लीन चिट दिली. गोकुळच्या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव पराभूत झाले तरी त्या पडेल पहेलवानाचा हात उंच करून फडणवीस यांनी त्यांना विजयी घोषित केले. हा आज रडीचा डाव असला तरी तो फक्त दोन घडीचाच डाव आहे. हा डाव जनता उधळून लावेल!