
मुलुंड पश्चिम येथील झोजवाला पेट्रोल पंपावरील कामगारांच्या मासिक वेतनात 4500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र शक्ती कामगार सेनेने पंपाचे मालक सोहेब मोदी यांच्यासोबत याबाबत नुकताच करार केला आहे. हा त्रैवार्षिक करार असून प्रत्येक वर्षी प्रत्येक कामगाराला प्रतिवर्षी 1500 रुपये याप्रमाणे तीन वर्षांत साडेचार हजारांची वेतनवाढ मिळणार आहे.
शिवसेना उपनेते गुरुनाथ खोत, माजी आमदार रमेश कोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शक्ती कामगार सेनेचे अध्यक्ष सगुण खोत यांनी हा करार केला. यावेळी युनिट अध्यक्ष शरद सावंत, उपाध्यक्ष मनोज यादव, सेक्रेटरी मनोज कुमार यादव, विजय जैस्वार, दिनेश यादव, अजय जैस्वार आदी कामगार पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र शक्ती कामगार सेना ही युनियन भारतीय कामगार सेनेची संलग्न युनियन असल्याचे अध्यक्ष सगुण खोत यांनी सांगितले.


























































