Pradeep Purnekar Case याचिकाकर्त्यांना नियमित खंडपीठासमोर दाद मागण्याची मुभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून काढून अन्य स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवण्यात यावा अशी मागणी करत पूर्णेकर कुटुंबीयांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज तातडीने सविस्तर सुनावणी घेण्यास सुट्टीकालीन खंडपीठाने नकार दिला तसेच याचिकाकर्त्यांना नियमित खंडपीठासमोर दाद मागण्याची मुभा न्यायालयाने दिली.

प्रदीप पूर्णेकर यांची ठाण्यात

29 सप्टेंबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास संथगतीने सुरू असून हत्येचा कट रचणारे अद्याप मोकाट फिरत असल्याचा दावा करत तक्रारदार मंदार घोडके व प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम यांनी हायकोर्टात ऍड. समीर हाटले यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या अन्य खंडपीठाने याचिकेवरील सुनावणी 5 डिसेंबरपर्यंत तहकूब केली असतानाच याचिकाकर्त्यांनी आज शुक्रवारी सुट्टीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती अद्वैत सेठना व न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठासमोर हा तपास हस्तांतरित करण्याची विनंती केली. त्यावर विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आलेले ज्येष्ठ वकील राजीव चव्हाण यांनी तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे खंडपीठाला सांगितले.

– गुन्हा दाखल झाल्यानंतर एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. अवघ्या दहा दिवसांत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून याचिकाकर्त्यांनी दिलेली कागदपत्रेही तपास यंत्रणा विचारात घेत असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. या युक्तिवादानंतर तपास सुरू असताना त्याबाबत आणखी कोणतेही निरीक्षण नोंदवण्यास आम्ही इच्छुक नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने याचिका नियमित खंडपीठासमोर सादर करण्याचे आदेश याचिकाकर्त्यांना दिले.