ठसा – जयंत मुखर्जी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जयंत अथवा जयंत मुखर्जी हिंदी चित्रपटसृष्टीत बाबू या नावाने ओळखले जात. त्यांची आणखी एक ओळख म्हणजे ते साठच्या दशकातील लोकप्रिय संगीतकार आणि पार्श्वगायक हेमंत कुमार यांचे सुपुत्र. जयंत मुखर्जी यांनाही पश्चिम बंगालमधील रवींद्र संगीताची उत्तम जाण. कोलकाता येथे असतानाच शेजारीच राहणाऱ्या आणि ‘बालिका बधू’ (1967) वगैरे बंगाली चित्रपटात भूमिका साकारत असलेल्या इंदिरा चटोपाध्याय हिच्याशी त्यांचा परिचय झाला. ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

हेमंत कुमार यांना ही सून म्हणून हवी होती आणि त्यानुसार त्यांनी लग्न करताच इंदिरा चटोपाध्याय हिची मौसमी चटर्जी झाली. आपल्या सुनेने हिंदी चित्रपटात भूमिका साकारावी असे हेमंत कुमार यांना मनोमन वाटत होते. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील आपले चांगले संबंध असलेल्या निर्माता, दिग्दर्शकांशी संपर्क साधला आणि मौसमी चटर्जीचे मुंबईतील हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल पडले. शक्ती सामंता दिग्दर्शित  ‘अनुराग’ (नायक विनोद मेहरा), राज खोसला दिग्दर्शित ‘कच्चे धागे’ (या चित्रपटात आपल्या पती अर्थात जयंत मुखर्जींसोबत मौसमी चटर्जीला संधी मिळाली) असे काही चित्रपट मिळाले आणि तिची हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी वाटचाल सुरू झाली. 1973 साली प्रदर्शित झालेल्या या दोन्ही चित्रपटांनी रौप्य महोत्सवी यश संपादले. ‘कच्चे धागे’ या चित्रपटातील या जोडीवरचे ‘हाय हाय एक लडका मुझको खत लिखता है’ हे गाणे लोकप्रिय ठरले. मुंबईतील चित्रपटसृष्टीत मौसमी चटर्जीची नायिका म्हणून घौडदौड सुरू असताना जयंत मुखर्जी संगीतप्रेमी असल्याने त्यांनी काही वर्षांनी खार येथे गीतांजली गीत ध्वनिमुद्रण स्टुडिओची स्थापना केली. या दोघांच्या संसारात पायल आणि मेघा अशा दोन मुलींचा जन्म झाला. जयंत मुखर्जी यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले. त्यांनी कुमार (खरे नाव हैदर अली) यांच्याकडे चित्रपट दिग्दर्शनाची जबाबदारी देत ‘मजाक’ (1975) या रोमँटिक विनोदी चित्रपटाची निर्मिती केली. नायिका अर्थातच मौसमी चटर्जी आणि नायक होता या दाम्पत्याचा कौटुंबिक मित्र विनोद मेहरा. काही वर्षांनी जयंत मुखर्जी यांनी बासू चटर्जी दिग्दर्शित ‘दो लडके दोनो कडके’ (1979) या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात मौसमी चटर्जी, अमोल पालेकर, नवीन निश्चल, निळू फुले, केश्तो मुखर्जी, विजू खोटे, रणजीत यांच्या प्रमुख भूमिका. या चित्रपटाला हेमंत कुमार यांचे संगीत आहे. या चित्रपटाला साधारण स्वरूपाचे यश प्राप्त झाले. म्हणून जयंत मुखर्जी यांनी चित्रपट निर्मितीऐवजी आता मालिका निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आणि 1992 साली ‘तलाश’ नावाची मालिका निर्माण केली. याचे दिग्दर्शन ऋषिकेश मुखर्जी यांनी केले.

पूर्वी फिल्मी पाटर्य़ांतून जयंत मुखर्जी आणि मौसमी चटर्जी एकत्र येत आणि मौसमी चटर्जी बाबू असे संबोधत असे. जयंत मुखर्जी यांनी मौसमी चटर्जीच्या कारकीर्दीत कधीही हस्तक्षेप केला नाही. फटकळ आणि बेधडक वक्तव्य करणाऱया मौसमी चटर्जीचाही जयंत मुखर्जींवरचा विश्वास व घट्ट नातेसंबंध तिच्या मुलाखतीत दिसून येत असे. काही वर्षांपूर्वी त्यांची मुलगी पायल हिचे निधन झाले तेव्हा साहजिकच हे दाम्पत्य फार शोकाकुल झाले होते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना काही काळ जाऊ द्यावा लागला. त्यांची दुसरी मुलगी मेघा मुखर्जीने बंगाली आणि हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्या. जयंत मुखर्जी ऊर्फ बाबू यांनी आपल्या कारकीर्दीचा आनंद घेतला म्हणून ते कायमच उत्साही असत.

दिलीप ठाकूर

[email protected]