
प्रा. सुभाष बागल
जगाची 17 ते 18 टक्के लोकसंख्या असलेल्या भारताकडे गोडय़ा पाण्याचे केवळ 4 टक्के साठे आहेत. पाणीटंचाईची बीजे यातच पेरली गेली आहेत. जगातील मोजक्या तहानलेल्या देशांत भारताची गणना होते. निसर्गाला त्यासाठी जबाबदार धरणे सर्वस्वी चूक आहे. अल निनोमुळे पिकं गेली एकवेळ मान्य, परंतु अतिवृष्टीच्या काही महिन्यांनंतर टंचाईची परिस्थिती उद्भवत असेल तर पाण्याचे गैरव्यवस्थापन, नियोजनशून्य वापर, उधळपट्टी त्याला जबाबदार आहे हे उघड आहे.
परतीच्या पावसाकडून थोडीफार आशा होती; तीही पूर्ण न झाल्याने शेतकऱयांची चिंता तर वाढली आहेच. शिवाय दुष्काळाची छायादेखील गडद झालीय. महाराष्ट्राला दुष्काळ तसा नवीन नाही. निर्मितीपासून ते आजवर राज्याने पंधरा दुष्काळांचा सामना केला आहे. त्यापैकी काहींचा विशेषत्वाने उल्लेख केला जातो. 1972-73 चा दुष्काळ त्यापैकी एक. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच विद्यमान दुष्काळ 1972-73च्या दुष्काळापेक्षा तीव्र असल्याचे म्हटल्याने त्याबाबत शंका उरत नाही. आधीची सलग दोन वर्षे दुष्काळाची गेल्याने तिसरे वर्षही तसेच निघाल्याने 1972-73 साली दुष्काळाची तीव्रता वाढली होती.
मराठवाडा, विदर्भात तुटीचे प्रमाण अधिक असल्याने दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम तर वाया गेलाच, परंतु जाता जाता तो शेतकऱ्याला आर्थिक फटका देऊन गेलाय. तोकडा पाऊस, वाढते तापमान यामुळे हजारो गाव आताच तहानेने कासावीस झाली आहेत. टँकरद्वारे पाणीपुरवठा करून त्यांची तहान भागवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातोय. शहरी भागातदेखील तशीच परिस्थिती आहे. राज्य सरकारने 10 टक्के पाणीकपातीची काढलेली अधिसूचना त्याचेच द्योतक. गेल्याच वर्षी सरासरीच्या 20 टक्के अधिक पाऊस अधिक झाल्याने नदीनाले भरभरून वाहत होते. सिंचन प्रकल्प काठोकाठ भरल्याने दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ आली होती. त्यालाही फक्त काही महिन्यांचाच काळ गेलाय. त्यामुळे एवढे सगळे पाणी गेले कुठे? असा प्रश्न साहजिकच पडतो. त्यासाठी पाण्याचा सर्वाधिक वापर ज्या क्षेत्रात होतो तेथील पाणी वापराचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते.
उपलब्ध पाण्यापैकी 85 ते 87 टक्के पाणी शेतीत सिंचनासाठी वापरले जाते. त्यामुळे शेतीतील पाणी वापराला वगळून पाणीटंचाईच्या प्रश्नाची चर्चा होऊ शकत नाही. वर्तमान दुष्काळाची तुलना ज्या 1972-73 च्या दुष्काळाशी केली जाते; त्या काळात हरित क्रांतीचे लोण गावखेडय़ापर्यंत पोहोचलेले नसल्याने शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करत. कुटुंबाच्या निर्वाहासाठी शेती केली जात असल्याने घेतल्या जाणाऱ्या विकासामध्ये वैविध्य होते. गावातील उसाचे क्षेत्र मर्यादित होते. साहजिकच भूगर्भातील पाणी उपसा कमी होता. हरित क्रांतीच्या रुजण्याबरोबर शेतीचे व्यापारीकरण होत गेले. शेतकऱ्यांकडून अधिक पैसे मिळवून देणाऱया उसासारख्या पिकाला प्राधान्य दिले जाऊ लागले. याचदरम्यान भूगर्भातील पाणी उपसा करण्याचे विंधन विहिरीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना ज्ञात झाले. त्यासाठी बँकांकडून कर्ज मिळू लागल्याने अशा विहिरींची संख्या व त्याबरोबर उसाखालील क्षेत्र वाढत गेले. त्याबरोबर पाणी पातळीही खाली जात गेली. ज्या भागात पूर्वी 30-40 फुटांवर पाणी लागत असे, तेथे आता 700-800 फुटांवरही पाणी लागण्याची, ते टिकण्याची शक्यता उरलेली नाही.
आपल्याकडील 63 टक्के क्षेत्र भूगर्भातील पाण्यावर अवलंबून आहे. यावरून सिंचनातील त्याचे महत्त्व लक्षात यायला हरकत नाही. मराठवाडय़ासारख्या अवर्षणप्रवण क्षेत्रातील उसाखालील क्षेत्र वाढण्याला हेच तंत्रज्ञान कारणीभूत ठरलेय. राज्यातील ऊस लागवड क्षेत्र 1960-61 साली 1.55 लाख हेक्टर होते, ते आता 16.06 लाख हेक्टरवर (2025-26) गेलंय. उसाबरोबर साखर कारखान्याची संख्यादेखील वाढत गेली. सध्या राज्यात 208 कारखाने आहेत. शेतमाल प्रक्रिया करून विकला तर खांडसरी मालकाकडून शेतकऱ्याची होणारी पिळवणूक थांबेल व त्याच्या उसाला चांगला भाव मिळेल या उदात्त हेतूने काही समाजधुरिणांनी एकेकाळी साखर कारखाने काढले, तेही सहकारी तत्त्वावर. तो काळ आता खूप खूप मागे पडलाय. अलीकडच्या काळात जे काही कारखाने निघाले किंवा निघत आहेत ते सर्व खासगी क्षेत्रात. एवढेच नव्हे, प्रस्थापित सहकारी कारखाने दिवाळखोरीत काढून ते ताब्यात घेण्याची समाजातील एका वर्गामध्ये स्पर्धा लागली असल्याचे पाहायला मिळते. साखर कारखान्याची अनेक अंगाने वाढलेली लाभप्रदता हे त्याचे कारण. तसं पाहिलं तर कारणं वेगवेगळी असली तरी ऊस हा शेतकरी आणि राजकारणी, दोघांनाही सारखाच प्रिय आहे.
ऊस लागवड क्षेत्रवाढीला वरील कारणे तर जबाबदार आहेतच, त्याव्यतिरिक्त सरकारचे शेतमाल किंमत धोरणही तितकेच जबाबदार आहे. तृणधान्य, तेलबिया, कडधान्यासाठी सरकारकडून नाही म्हटलं तरी हमीभावाची घोषणा केली जाते, परंतु विक्रीची हमी नसल्याने शेतकऱ्याला प्रक्षोभक बाजारपेठेचा सामना करावा लागतो. त्यात फटका बसण्याची शक्यता असल्याने भाव व विक्रीची हमी असलेल्या उसासारख्या पिकाकडे शेतकरी वळत असतील तर त्यांना दोष देणे कितपत योग्य आहे? 2030 सालापर्यंत डाळी व खाद्यतेले यात आत्मनिर्भरतेची घोषणा सरकारने करून काही वर्षे लोटली. तिची पूर्तता होण्याची कुठलीही चिन्हे नाहीत. जोपर्यंत या पिकांच्या उत्पादनातून चार पैसे मिळण्याची खात्री शेतकऱ्याला वाटत नाही, तोवर त्याच्या लागवडीखालील क्षेत्र वाढणार नाही हे उघड आहे.
पाणीटंचाईचा सामना करावा लागणारे प्रगत देश पुनर्वापर, पुनर्भरण यावर तर भर देतातच. शिवाय पाण्याच्या वापरावर कडक निर्बंध लादणे, मीटरद्वारे पाणी वापराचे नियंत्रण करणे, वेगवेगळ्या वापरासाठी वेगवेगळे दर आकारणे, शेतीतील सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धती अनिवार्य करणे, पाण्याचा किमान अपव्यय होईल याची काळजी घेणे यांसारखे उपाय योजतात. त्यामुळे दुष्काळामुळे पिके गेली तरी पाणी टंचाईचा सामना त्यांना करावा लागत नाही. जल संवर्धनाच्या विविध कार्यक्रमाची अपरिहार्यता टाळता येणारी नाहीच, परंतु त्याबरोबर विविध क्षेत्रांतील पाणी वापराचे नियमन करणेदेखील गरजेचे आहे. नळाला तोटी आणि पाणी मापक मीटर बसवण्याची योजना प्रामाणिकपणे राबवली तरी पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार नाही, हे मान्य परंतु त्याची तीव्रता कमी होऊ शकते, हे नाकारता येत नाही.





























































