
दिवाळी अंक म्हणजे केवळ कथा, कविता आणि ललित लेखांचा संग्रह नव्हे, तर विविध विषयांवरील विचारमंथन आणि वाचनाचा आनंद देणारा साहित्यिक उत्सव. याच परंपरेला पुढे नेत ‘चंद्रकांत’ दिवाळी अंकाने यंदाही वाचकांसाठी वैविध्यपूर्ण साहित्याची मेजवानी सादर केली आहे. या अंकाचे वैशिष्टय़ म्हणजे विषयांची विविधता.
डॉ. प्रसन्न संत यांच्या ‘सू’ या कादंबरीसह सामाजिक आणि कौटुंबिक विषयांवर भाष्य करणारे लेख वाचायला मिळतात. ‘एकांत’सारख्या विषयातून मानवी भावविश्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच ग्रामीण जीवन, श्रद्धा, परंपरा आणि आधुनिकता यांचाही वेगवेगळ्या लेखांतून ऊहापोह करण्यात आला आहे. रामायणातील प्रसंगांचे वेगळ्या दृष्टिकोनातून केलेले वर्णन, लंका आणि रामायणाशी संबंधित लेख, ऐतिहासिक व सांस्कृतिक संदर्भ असलेले लिखाण यामुळे अंकाच्या आशयात वैविध्य आले आहे. प्रवास वर्णनांमधून वाचकांना नव्या ठिकाणांची ओळख होते, तर विविध सामाजिक विषयांवरील लेख विचार करायला भाग पाडतात. शब्दकोडी, साहित्यिक लेख आणि वाचनीय सदरांमुळे अंकाची रंगत वाढते. केवळ मनोरंजन न करता माहिती, ज्ञान आणि विचारांची नवी दिशा देण्याचा प्रयत्न या अंकातून दिसून येतो.
संपादक ः नीलिमा कुलकर्णी
पृष्ठs ः 264, मूल्य ः 450
धनंजय
‘धनंजय’ हा दिवाळी अंक आता आपल्या 66 व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. गेली कित्येक वर्षे भय, गूढ आणि रहस्याचा वेध घेत हा अंक वाचकांच्या भेटीस येत आहे. आताच्या काळात या अंकाने विज्ञान कथांच्या माध्यमातूनही आपल्या रंगतीत भर घातली आहे. अंकाच्या माध्यमातून केवळ यंत्र आणि तंत्रज्ञानच नव्हे, तर त्यासोबत रहस्य, गूढ आणि कधी कधी शेवटची थक्क करणारी कलाटणी पाहायला मिळते, जी आता वाचकांच्या सवयीची झाली आहे. यंत्रमानव, त्यांचा रोजच्या व्यवहारातील वापर, रहस्य शोधण्यासाठी केलेला प्रयत्न, त्यांच्यामध्ये भावनांचे रोपण तसेच मानवी स्वभावाचे अनेक पंगोरे या कथांमधून मांडले जातात. यातून निर्माण झालेल्या सूड, द्वेष आणि प्रेम यांसारख्या भावना आणि त्यातील गुंतागुंत अतिशय उत्तम प्रकारे हाताळली गेली आहे. अंकामध्ये 40 कथा समाविष्ट आहेत, ज्यामध्ये अनुभवी जुन्या लेखकांसोबतच नवोदित लेखकांनाही स्थान देण्यात आले आहे. ‘वाचक देवो भव’ हे ‘धनंजय’ अंकाचे ब्रीद असून वाचकप्रियता टिकवून ठेवण्यात हा अंक यशस्वी ठरला आहे. विज्ञान, गूढ आणि मानवी भावनांचा उत्तम संगम असलेला हा दिवाळी अंक वाचकांसाठी एक पर्वणीच ठरतो.
संपादक ः नीलिमा कुलकर्णी
पृष्ठs ः 328, मूल्य ः 450




























































