मुलाखत – सुबोध, सुसंस्कारित ‘मुलांचे मासिक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रशांत गौतम

नागपूरहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘मुलांचे मासिक’ने शंभराव्या दिवाळी अंकाचा टप्पा गाठला आहे. अंकाचे प्रकाशन 26 नोव्हेंबर 2026 रोजी नागपुरात होत आहे. त्यानिमित्त साधलेला संवाद.

शंभराव्या दिवाळी अंकानिमित्त काय वाटते?

– नोव्हेंबर 1927 मध्ये पहिला अंक दिवाळी अंक म्हणून प्रसिद्ध झाला. शंभराव्या वर्षातील पहिला अंक शंभरावा दिवाळी अंक ठरत आहे. मन आनंदाने भरले आहे. आजोबा-वडिलांनी सोपवलेली जबाबदारी यथाशक्ती पार पाडता आली, याचे समाधान आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे हे काम करू शकलो.

शंभराव्या अंकाचे काय खास वैशिष्टय़ आहे?

– या शंभराव्या दिवाळी अंकात वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, चि. वि. जोशी, मंदा बोडस, मालतीबाई दांडेकर, लीला पाटील, श. रा. देवळे यांचे अजरामर बालसाहित्य खास पुनर्प्रकाशित केले आहे. शिवाय आम्ही आयोजित केलेल्या बालकथा लेखन स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कथाही आहेत. नव्या पिढीतील प्रतिभावंत लेखकांचेही बालसाहित्य अंकात प्रसिद्ध झाले आहे.

दोन पिढय़ांचा वारसा आणि पहिल्या अंकाविषयी सांगा.

– संस्थापक संपादक बा. रा. मोडक यांनी 1927 ते 1990 अशी 63 वर्षे संपादन केले. त्यानंतर वडील माधव बाळकृष्ण मोडक यांनी वीस वर्षे संपादन केले. ‘तरुण भारत’मधील 35 वर्षांच्या पत्रकारितेचा अनुभव त्यांना होता. प्रेसमधील काम, मासिकाचे स्वरूप आणि लेखक-कवींशी संवाद पाहत मी शिकलो. दोघांनी लेखकांशी जिव्हाळ्याचे संबंध जपले. त्यांच्या प्रयत्नांतून मासिकाला सुबोध, सुशील, सुसंस्कारित स्वरूप मिळाले. साध्या-सोप्या कथा-लेखांतून संस्कार, विज्ञानदृष्टी आणि सभोवतालाविषयी जाण दिली. काळानुसार मासिकात तांत्रिक व आशयात्मक बदल झाले.

ह  मुलं वाचत नाहीत, या तक्रारीबद्दल काय सांगाल?

– नियमित प्रसिद्ध होणारी बालमासिके फार कमी आहेत. मोबाईल-तंत्रज्ञानामुळे अवांतर वाचन मागे पडले आहे. कला-वाचन मुलांना संवेदनशील बनवतात आणि कल्पनाशक्तीला वाव देतात. प्रश्न पडायला लावणारे साहित्य हवे. आकाश निळे का? मुंगी अधिक वजन कशी उचलते? रोबोट मित्र होऊ शकतो का? असे प्रश्न जागवणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे. मुले मराठीच नव्हे, इंग्रजीतही फारसे वाचत नाहीत. उत्सुकता वाढवणारे, पुढील भागाची ओढ लावणारे साहित्य दिले तर मुले वाचतील.

बालसाहित्यिकांची नवी पिढी कशी घडेल?

– पूर्वी दैनिकांच्या रविवार पुरवण्यांत बालविभाग असायचे. त्यातून नवे लेखक-कवी घडले. मुलांसाठी मनोरंजक, चांगले आणि उपदेशात्मक नसलेले साहित्य लिहिणारे नवे साहित्यिक निर्माण होणे गरजेचे आहे.

शताब्दीनिमित्त कोणते उपक्रम आहेत?

– कथा स्पर्धेला पावणेदोनशे कथा मिळाल्या. काही अमेरिकेतूनही आल्या. मुलांसाठी कथा-कविता व चित्रकला स्पर्धा, तसेच बालसाहित्यिकांसाठी जीवनगौरव, उत्कृष्ट कादंबरी आणि स्त्राr साहित्यिकांसाठी पुरस्कार देण्याचे नियोजन आहे.