बोलीभाषेची समृद्धी – पुणेरी बोली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वर्णिका काकडे

पुणेरी बोली ही मराठी भाषेतील एक प्रादेशिक बोली आहे, जी पुण्यात आणि आसपासच्या परिसराज बोलली जाते. काही लोक या पुणेरी बोलीला प्रमाण मराठी मानतात. तांत्रिकदृष्टय़ा पुणेरी ाबेलीत व्याकरणाचे नियम पाळले जातात. तसेच इतर मराठी बोलींप्रमाणेच या बोलीतही वेगळेपण आहे. ‘पुणेरी’ हा शब्द या शहराच्या वैशिष्टय़पूर्ण भाषेसाठी किंवा स्वभावासाठी वापरला जातो. व्याकरणशुद्धता, ठसकेबाजपणा हे पुणेरी बोलीचे विशेष आहेत.

 जोडाक्षरांचे स्पष्ट उच्चार आणि प्रमाण मराठीशी साधर्म्य हे तिचे ओळखले जाणारे वैशिष्टय़ मानले जाते. पेशव्यांच्या काळातील पेठांमधील भाषेचा वारसा आणि ‘पुणेरी पाटय़ां’मधील खोचक, मिश्किल विनोद यामुळे या बोलीला वेगळी ओळख मिळाली आहे. प्रत्यक्षात संपूर्ण पुण्यात एकच बोली बोलली जात नाही; जुन्या पेठांतील बोलण्याची लकब, उपनगरांतील भाषा आणि आसपासच्या ग्रामीण भागातील रांगडी मराठी यात फरक आढळतो.

कोणतीही भाषा ही पूर्वी बोलीच्या रूपांतच असते. मराठीला जरी आज भाषेचा दर्जा असला तरी ती पूर्वी बोलीच्या रूपातच होती. कोणत्याही बोलीमध्ये जेव्हा राज्यकारभार, प्रशासन, वृत्तपत्रे, न्यायव्यवस्था कार्यरत होतात तेव्हा त्या बोलीला भाषेचा दर्जा प्राप्त होत असतो. त्यामुळे कोणतीही भाषा ही मूळ असते हे जितके खरे आहे तितकेच ती भाषा जो समाज वापरत असतो तीही बोलीभाषाच असते. त्यानुसार महाराष्ट्राच्या संदर्भात विचार करू लागलो तर खानदेशी, व्रहाडी, कोकणी, पुणेरी या मुख्य बोली म्हणून ओळखल्या गेल्या. कालांतराने पुणेरी म्हणजे मध्यवर्ती बोलीला मराठी भाषेचा दर्जा प्राप्त झाला.

एका अर्थाने पुणेरी बोली ही स्वतंत्र भाषा नसून पुण्यातील पारंपरिक व प्रमाण मराठीच्या जवळ जाणारी बोलण्याची शैली आहे, जी स्पष्ट उच्चार, व्याकरणशुद्धता आणि उपहासात्मक किंवा मिश्किल शैलीसाठी ओळखली जाते, असेही म्हटले जाते. परंतु पुणेरी बोली ही प्रमाणभाषा मानले जाण्याचे कारण म्हणजे पुणे ही मराठा साम्राज्याची सांस्कृतिक राजधानी होती आणि वसाहत असतानाही, पुणे संपूर्ण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक दृष्टय़ा केंद्रस्थानी होते.