
ठाणेकरांनो, थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटवाल तर 5 हजार रुपये तयार ठेवा. उघड्यावर कचरा जाळून हवेचे प्रदूषण करणाऱ्यांविरोधात मुंबईपाठोपाठ ठाणे महापालिकेनेही कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे शेकोटी पेटवताना प्लास्टिक, पालापाचोळा आणि रस्त्यावरील कचरा जाळणाऱ्यांना आता चांगलेच महागात पडणार आहे. शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला असून यासाठी प्रदूषण नियंत्रण विभागाने चार विशेष पथके तयार केली आहेत.
शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. शनिवारी सकाळी 6.30 वाजता ठाण्यात 21.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
रात्रीच्या वेळी गारठा अधिक जाणवत असल्याने नागरिक, सुरक्षारक्षक आणि अन्य कामगारांकडून शेकोट्यांचा आधार घेतला जातो. मात्र या शेकोट्यांसाठी लाकडांऐवजी प्लास्टिक, कचरा आणि पालापाचोळा जाळला जात असल्याने हवेत विषारी घूर पसरत आहे. त्यामुळे थंडीची हुडहुडी घालविण्याच्या नादात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे प्रदूषण विभागाचे स्पष्ट केले.
दमा, श्वसनाचे विकार, खोकला, घशाच्या तक्रारी
शेकोट्यांच्या होणाऱ्या प्रचंड धुरामुळे दमा आणि फुफ्फुसांच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना अशा धुराचा अधिक त्रास होतो. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनाही श्वसनाचे विकार, खोकला आणि घशाच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते. हवेतील प्रदूषणात वाढ होत असल्याने पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील विविध भागांत रात्रीच्या सुमारास चार विशेष पथके गस्त घालणार असून उघड्यावर शेकोटी करताना कोणी आढळल्यास संबंधित व्यक्तीला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. थंडीपासून बचावासाठी शेकोटीचे प्रकार टाळावेत, अन्यथा आर्थिक दंडाला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रदूषण नियंत्रण विभागप्रमुख विद्या सावंत यांनी दिला.



























































