
वरळीतील शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाची दुरवस्था झाली आहे. या स्मारकाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी युवासेनेने मुंबई महापालिका जी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे पत्राद्वारे केली होती. युवासेनेच्या मागणीची दखल घेत बुधवारपासून या स्मारकाच्या दुरुस्तीच्या कामाला पालिकेकडून सुरुवात करण्यात आली आहे.
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये क्रूरकर्मा दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडण्यासाठी शहीद तुकाराम ओंबळे यांनी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले होते. त्यांच्या स्मरणार्थ 2009 साली वरळी पोलीस वसाहत येथील सर पोचखानवाला रोड येथे शहीद तुकाराम ओंबळे यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाची दुरवस्था झाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना उपविभाग अधिकारी अभिजीत पाटील यांनी जी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांना निवेदन दिले होते. अखेर या स्मारकाची दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे.































































