
कुर्ला फिनिक्स मॉलजवळील प्रमोद महाजन उद्यानात प्रेमीयुगुलाला अल्पवयीन मुलांनी मारहाण केल्याच्या घटनेनंतर उद्यानांच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. सुरक्षेतील त्रुटी आणि देखभालीतील निष्काळजीपणा समोर आल्यानंतर संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली.
पालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे आणि बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्ष हेतल गाला यांनी बुधवारी कुर्ला येथील उद्यानाची पाहणी केली. उद्यानाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, तसेच त्याला दिलेली सर्व उद्यानांची कंत्राटे रद्द करून कायमस्वरूपी काळय़ा यादीत टाकावे, अशी मागणी भांदिर्गे यांनी केली. कंत्राटदाराला ठोठावलेला एक लाख रुपयांचा दंड अपुरा असल्याचे सांगत नियमानुसार कमाल दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
































































