
प्रभाग क्र.220 मधील चोरबाजार परिसरात पाणीपुरवठय़ाची मुख्य जलवाहिनी क्लस्टर पुनर्विकासाचे काम करणाऱया ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तुटली आणि त्यामुळे परिसरातील रहिवाशांना तीन ते चार दिवस पाण्यासाठी वणवण करावी लागली. याप्रकरणी ठेकेदारावर एफआयआर दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली.
प्रभाग क्र. 220 मधील एसबीयूटी क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पातील कामादरम्यान महानगरपालिकेची मुख्य जलवाहिनी तुटली. ठेकेदाराने जलवाहिनी त्वरित दुरुस्त न करता तोडलेल्या मूळ जलवाहिनीला बूच मारून ठेवले आणि त्याची माहिती पालिकेच्या पाणीखात्याला दिली नाही. त्यामुळे चोरबाजार परिसरातील बाराईमाम रोड, चिमणाबुचर स्ट्रीट व मटन स्ट्रीट या परिसरांमध्ये 17 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत नागरिकांना पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे लोकांचे हाल झाले.या ठेकेदारावर एआयआर दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका संपदा मयेकर यांनी हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे शुक्रवारी स्थापत्य समितीच्या बैठकीत केली. पाणीपुरवठा बंद राहिल्यामुळे नागरिकांच्या पाण्याच्या मोटारी जळाल्या. त्यांना टॅंकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागले. याची नुकसानभरपाई ठेकेदाराने द्यावी, अशी मागणी मयेकर यांनी केली.



























































