मुंबई वगळता राज्यातील 2011 पूर्वीची अनधिकृत घरे अधिकृत होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहर व उपनगर जिल्हा वगळता राज्याच्या उर्वरित भागातील 1 जानेवारी 2011 पूर्वीची शासकीय जमिनींवरील अनधिकृत घरे अधिकृत होणार असून त्या मोहिमेला राज्य सरकारने गती दिली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी गठीत आढावा समित्यांवर सह अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही निवासी बांधकामे अधिकृत करताना फक्त 1500 चौरस फुटापर्यंतचेच अतिक्रमण नियमित केले जाणार आहे. त्यापेक्षा जास्त अतिक्रमण असेल तर ते पाडून टाकण्यात येईल. नदीची पात्रे, नाले, गायरान, सार्वजनिक रस्ते, वने, स्मशानभूमी, खेळाची मैदाने आणि शाळा किंवा रुग्णालयांसाठी आरक्षित जमिनींवरील अतिक्रमणांना मात्र कोणतेही संरक्षण दिले जाणार नाही. ती पाडून टाकण्यात येतील आणि बाधित कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे देण्यात येतील. परदेशी व्यक्ती किंवा बांगलादेशींनी केलेल्या अतिक्रमणांना कोणत्याही परिस्थितीत वाचवले जाणार नसून त्यावर तातडीने कारवाई करून संबंधितांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.