अल्पवयीन गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार  

खाऊ देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन गतिमंद मुलीला घरात नेऊन 30 वर्षीय तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना वाशीनाका येथे घडली. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरसीएफ पोलिसांनी बलात्कार व पोक्सोचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

पीडित मुलगी तिच्या कुटुंबीयांसह चेंबूरच्या वाशीनाका परिसरात राहते. मुलगी शारीरिक विकलांग आणि गतिमंद आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास  मुलगी घराबाहेर खेळत असताना त्याच परिसरात राहणाऱया 30 वर्षीय तरुणाने तिला खाऊच्या बहाण्याने सोबत नेले. त्याने मुलीला पेय आणि बिस्किट देऊन आपल्या घरी नेले आणि तिला आपल्या वासनेची बळी बनवली. ही बाब कोणाला सांगू नको असे त्याने मुलीला धमकावले. मात्र घरी गेल्यानंतर मुलीने घडला प्रकार आईला सांगितला. मुलीचे ऐकल्यानंतर तिच्या आईने तत्काळ आरसीएफ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक केदारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला गुरुवारी रात्री अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 31मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपी विवाहित असून दारूडा आहे.