इमारतीच्या लिफ्टमध्ये चार वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
camera-cctv-image

सामना प्रतिनिधी । मुंबई

इमारतीच्या लिफ्टमधून खाली येत असताना एका चार वर्षांच्या मुलीला भयानक प्रकाराला सामोरे जावे लागल्याची घटना बुधवारी ट्रॉम्बे येथे घडली. लिफ्टमध्ये असताना त्याच इमारतीत राहणाऱया एका महिलेने त्या चिमुकलीला बेदम मारहाण केली. हा प्रकार समोर येताच ट्रॉम्बे पोलिसांनी रिझवाना शेख या महिलेला अटक केली आहे.

ट्रॉम्बे येथील महाराष्ट्र नगरात असलेल्या इमारतीत बुधवारी सायंकाळच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुस्कान (नाव बदललेले) ही चार वर्षांची मुलगी लिफ्टने खाली उतरत होती. त्याचवेळी लिफ्टमध्ये आलेल्या रिझवाना बेगम मोहम्मद रईस या महिलेने मुस्कानच्या डोक्यावर हात ठेवून काही तरी पुटपुटायला सुरुवात केली. त्यानंतर थोडाच वेळात रिझवाना हिंस्र झाली आणि तिने मुस्कानला मारहाण करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला लिफ्टमध्ये सीसीटीव्ही असल्याचे रिझवानाच्या लक्षात आले नाही. त्यामुळे ती बिनधास्त मुस्कानवर अक्षरशः तुटून पडली. तिने मुस्कानला बेदम चोपले. त्यानंतर मुस्कानला झोपवून ती तिच्या अंगावर बसली. पण सीसीटीव्ही असल्याचे लक्षात येताच रिझवाना हिने लिफ्टमधली वीज बंद केली.

नाइट व्हिजन कॅमेऱ्याने टिपले प्रकार

लिफ्टच्या नाइट व्हिजन कॅमेऱ्यात सगळा प्रकार कैद झाला. त्यानंतर इमारतीमधील रहिवाशांनी लिफ्टचा दरवाजा उघडल्यावर आत सुरू असलेला प्रकार उघडकीस आला. रहिवाशांनी रिझवानाला बाहेर काढून तिच्या तावडीत सापडलेल्या मुस्कानची सुटका केली. हा प्रकार मुस्कानच्या आईला समजल्यानंतर तिने ट्रॉम्बे पोलिसांत धाव घेतली आणि घडला प्रकार सांगितला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून रिझवाना शेख हिला अटक केली.

दरम्यान, रिझवाना चेटूक करत असावी, ती मुस्कानला पकडून काही तरी पुटपुटत होती. हा प्रकार धक्कादायक असून त्या महिलेवर कठोर कारवाई झाली पाहिजे असे इमारतीमधील रहिवाशांचे म्हणणे आहे.