
गेल्या काही दशकांत तंत्रज्ञानाच्या मदतीने विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. विविध आजारांवर उपचार शोधले आहेत. वेगवेगळय़ा लक्षणांवरून भविष्यात उद्भवू शकणाऱ्या गंभीर आजारांचा अंदाजदेखील लावणे शक्य झाले आहे. आता वैज्ञानिकांनी चक्क एखाद्या व्यक्तीचे ‘ब्रेकअप’ कधी होईल याचा अंदाज अगोदरच लावणे शक्य असल्याचे सांगितले आहे. असा अंदाज लावण्यासाठी वैज्ञानिकांनी एक अनोखी पद्धत शोधून काढली आहे. ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी यासाठी 6 हजार 803 Reddit वापरकर्त्यांच्या एकूण 10 लाख 27 हजार 541 पोस्टचा अभ्यास केला. संशोधकांनी यासाठी काही खास युजर्सची निवड केली होती. या सर्व वापरकर्त्यांनी subreddit r/BreakUps वर पोस्ट केल्या होत्या. अर्थात त्यामुळे त्यांचा ब्रेकअप झाल्याचे निष्पन्न झाले होते. संशोधकांनी या युजर्सच्या पोस्टचा सलग तीन महिने अभ्यास केला. संशोधकांना त्यात असे आढळून आले की, ब्रेकअपमुळे लोकांवर कसा वेगवेगळा परिणाम झाला होता किंवा त्यांची भाषा आणि वागणूकदेखील बदलली होती. या अभ्यासामध्ये असे निष्पन्न झाले की, ब्रेकअपच्या तीन महिनेआधी माणसाची भाषा बदलू लागते आणि त्याच वेळी ब्रेकअपची चिन्हेदेखील दिसायला लागतात. या काळात माणूस स्वतःबद्दल जास्तीत जास्त पोस्ट करायला लागतो. ‘मी’, ‘माझे’ हा उल्लेख वाढायला लागतो. त्याची भाषा अनौपचारिक होते आणि लिखाणात उदासीन शब्दांचा वापर वाढायला लागतो. माणूस स्वतःला एकटे समजू लागलेला असतो. तो एखादी गोष्ट शेअर करावी का नाही याबद्दल पुनः पुन्हा विचार करायला लागतो. ज्या कालावधीत अशा व्यक्तीचे संबंध चांगले असतात, सर्व काही सुरळीत सुरू असते, त्या काळात मात्र सदर व्यक्तीमध्ये अशी कोणतीही लक्षणे आढळत नाहीत, मात्र ज्या वेळी त्याच्या विचारांमध्ये, मनामध्ये बदल व्हायला सुरुवात होते, त्याच काळात ही लक्षणे दिसायला सुरुवात होते. संशोधकांनी लावलेल्या या अनोख्या शोधाची सध्या चांगलीच चर्चा चालू आहे आणि लोक त्याची पडताळणी करण्याचादेखील प्रयत्न करत आहेत.





















































