‘खोकेखोर’ संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुंडगिरी करून शेतकरी महिलेची जमीन हडपली!

वाघाची शिकार केल्याची कबुली देऊन वन विभागाच्या जाळ्यात सापडलेले मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत भर पडली आहे. शेतकरी महिलेची जमीन लाटण्यासाठी गुंडागर्दी केल्याप्रकरणी संजय गायकवाड, त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड, सोमनाथ चौबे, त्याची पत्नी दीपाली चौबे आणि ज्ञानेश्वर वाघ या पाच जणांविरुद्ध बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नागपूर-राजूर येथील नीता उपाध्ये या शेतकरी महिलेने संजय गायकवाड यांच्या गुंडागर्दीविरुद्ध मोताळा न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या अर्जावर सुनावणी करुन न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार बुलढाण्यातील बोराखेडी पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री संजय गायकवाड यांच्यासह पाच जणांविरुद्ध भादंवि कलम 156(3), 143, 150, 379, 385, 447 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.