दुचाकी विक्रेत्याकडून चारचाकी गाडी घेऊन त्याला पैसे न देता दमदाटी केल्याप्रकरणी सोलापुरातील शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखासह साथीदारावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मनीष काळजे जिल्हाप्रमुखाचे नाव असून, आकाश मुदगल त्याच्या साथीदाराचे नाव आहे. याबाबत विठ्ठल दत्तात्रय मुनगापाटील, (वय 39, रा अक्कलकोट रोड, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. विठ्ठल मुनगापाटील यांचा जुन्या चारचाकी गाडी विक्रीचा व्यवसाय आहे. फिर्यादी हे पुणे-मुंबई येथून गाडय़ा आणून त्या सोलापूर शहरात विकतात. 4 जानेवारी रोजी फिर्यादीच्या ओळखीचे आकाश मुदगल यांनी मनीष काळजे यांना चारचाकी गाडी घ्यावयाची आहे, असे सांगितले.
फिर्यादी मुनगापाटील यांनी त्यांच्या जवळील चारचाकी गाडी मनीष काळजे आणि आकाश मुदगल यांना दाखवली. त्यानंतर चार लाख रुपयांना सौदा ठरला. यापैकी एक लाख रुपये ऍडव्हान्स दिले. तर उरलेले पैसे दोन दिवसांत देतो, असे सांगून वाहन घेऊन गेले. याबाबत फिर्यादी मुनगापाटील यांनी काळजे याच्याकडे पैशाची मागणी केली असता, वरील दोघांनी त्यांना दमदाटी केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कुकडे करत आहेत.