
सामना ऑनलाईन । पुणे
पुण्यात होर्डींग कोसळून झालेल्या अपघातात नाना पेठेत राहणारे रिक्षा व्यावसायिक शिवाजी देविदास परदेशी यांचा मृत्यू झाला. परदेशी यांच्या पत्नीचे गुरुवारी निधन झाले होते. त्यांच्या अस्थी विसर्जन करून ते परत येत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. परदेशी यांची दोन मुलं देखील त्यांच्यासोबत होती. सुदैवाने ते दोघेही बचावले मात्र दोन दिवसांत आई वडिलांचा पाठोपाठ मृत्यू झाल्याने मुलांना जबरदस्त धक्का बसला आहे.
पुणे होर्डिंग प्रकरणी रेल्वेच्या दोघांना अटक
परदेशी यांची पत्नी प्रीती परदेशी यांच्या पायावर दोन दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र शस्त्रक्रियेच्या वेळी अचानक रक्तदाब कमी होऊन प्रीती यांचा मृत्यू झाला होता. प्रीती यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने त्यांचे पती शिवाजी व चार वर्षांचा मुलगा समर्थ व १७ वर्षांची मुलगी समृद्धी यांना जबरदस्त धक्का बसला होता. गुरुवारी परदेशी कुटुंबीयांनी आळंदी येथे जाऊन प्रीतीच्या अस्थिविसर्जन केल्या. तेथून परत येत असताना शाहीर अमर शेख चौकात सिग्नलला त्यांची रिक्षा थांबलेली असताना रिक्षावर होर्डिंग कोसळले. या अपघातात शिवाजी यांचा जागीच मृत्यू झाला. आईचे अंत्यसंस्कार करून परतणाऱ्या समर्थ व समृद्धीने त्यांच्या वडीलांचा डोळ्यासमोर मृत्यू होताना पाहिला. आई व वडिलांचा पाठोपाठ मृत्यू झाल्याने दोन्ही मुलांची रडून स्वत:ची हालत खराब झाली असून त्यांच्या या परिस्थितीवर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
summary : A day after wife’s death, auto driver dies in accident



























































