कवठे येमाईत डेंग्यूचा रुग्ण आढळला; आरोग्य विभाग अलर्टवर

शिरूरच्या पश्चिम भागातील कवठे येमाई गावठाणाच्या मुख्य बाजार पेठेतच डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दामोदर मोरे,ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रास ही माहिती मिळताच आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. स्थानिक आशा स्वयंसेविका, 2 आरोग्य निरीक्षकांच्या पथकाने सोमवारी गावच्या वाड्या वस्त्या पिंजून काढीत सर्व्हे करीत नागरिकांना योग्य त्या दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. थंडी, ताप, घसा खवखवणे,अंगदुखी जाणवत असलेल्या रुग्णांनी तात्काळ कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन मोफत रक्त तपासणी करून घेण्याचे व वेळीच औषोधोपचार करण्याचे आवाहान कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप शिरसाट यांनी केले आहे.

कवठे येमाईत आरोग्य विभागाच्या पथकाने सोमवारी केलेल्या सर्वेक्षणानुसार 252 घरांना भेटी देत 391 वॉटर कंटेनर तपासण्यात आले. त्यातील 8 ठिकाणी डासांच्या अळ्या आढळल्या. ते पाण्याचे कंटेनर तात्काळ रिकामे करण्यात आले. गाव व परिसरात डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरीयाच्या पार्श्वभूमीवर कीटक शास्त्रीय कंटेनर तपासणी करण्यात आली. यात आशा स्वयंसेविकांची 4 पथके, 2 आरोग्य निरीक्षक पथकात सहभागी झाले होते. नागरिकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करताना आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी साठा ठेवू नका, एक दिवस कोरडा दिवस पाळा, रात्री मच्छर चावणार नाहीत या करीता योग्य त्या उपाययोजना अवलंबवाव्या, अशा सूचना देण्यात आल्या. थंडी,ताप,घसा खवखवणे,अंगदुखी जाणवत असलेल्या रुग्णांनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून घेण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दामोदर मोरे,कवठे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव पानगे,डॉ.संदीप सिरसाट यांनी केले आहे.

गावात अनेकांना थंडी,ताप,घसा खवखवणे,अंगदुखी डोकेदुखी अशा समस्या जाणवत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने देखील युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना तात्काळ सुरु केल्या आहेत. दक्षता म्हणून संपूर्ण गावठाण परिसरात तणनाशक,धुरळणी तसेच पाण्यात टाकण्यासाठी 500 मेडीक्लोअर जंतुनाशक बाटल्या औषधे नागरिकांना देण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी चेतन वाव्हळ,सरपंच सुनीता पोकळे यांनी दिली.