
साखर कारखान्यांतील वजनकाटे तपासणीसाठी कोल्हापूर जिह्याला दिलेली तब्बल एक कोटी रुपयांची हायड्रोलिक व्हॅन ताराबाई पार्क येथील गोकुळ दूध संघ कार्यालय परिसरात गेल्या दहा वर्षांपासून वापराविना पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विकत घेतल्यापासून ही व्हॅन एक किलोमीटरसुद्धा धावलेली नाही. वैधमापनशास्त्र्ा विभागाने ही व्हॅन जाणीवपूर्वक लपवून ठेवली असून, ती भंगारात काढण्याचा डाव असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, याबाबत आंदोलन करणार असल्याचे पत्र दिल्यानंतर वैधमापनशास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक दत्ता पवार व सर्व निरीक्षक कार्यालयात फिरकलेच नाहीत. ते जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्याने पळपुटय़ा अधिकऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची हकालपट्टी करा, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पवार यांच्या खुर्चीला निवेदन चिकटवण्यात आले. तसेच उपस्थित शेतकऱ्यांकडून या व्हॅनचे पूजन करण्यात आले.
महाराष्ट्रातील सर्व मोठय़ा क्षमतेचे वजनकाटे म्हणजे वाहनकाटे (वेब्रिज) याच्या अचूक तपासणीसाठी कायद्यानुसार मोठय़ा क्षमतेच्या वजनांची आवश्यकता असते. केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाच्या वैधमापन यंत्रणांना अशा प्रकारच्या वजनांचे सेट असलेल्या सुसज्ज गाडय़ा (हायड्रोलिक व्हॅन) दिलेल्या आहेत. मोठय़ा क्षमतेच्या काटय़ांची पडताळणी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मोठे वाहनकाटे पडताळणी करताना 50 टक्के मानक वजने म्हणजेच प्रमाणित केलेली वजने व 50 टक्के डमी वजने वापरण्याचा नियम आहे. त्यानुसार गाडय़ांमधील वजनांचा वापर करून वाहन काटे प्रमाणित करणे आवश्यक आहे.
कोल्हापूर जिह्यासाठी सन 2014 मध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली कोटय़वधी रुपयांची हायड्रोलिक व्हॅन वैधमापन शास्त्र्ा विभागाला देण्यात आली. साखर कारखान्यातील काटामारी नेहमीच चिंतेची बाब राहिली आहे. शेतकऱ्यांना वजनकाटय़ांची उलट तपासणी कशी करावी, याचे ज्ञान नाही, या अज्ञानाचा गैरफादा घेऊन साखर कारखानदार राजरोसपणे हा काटामारीचा गोरखधंदा करीत आहेत. यातून शेतकऱ्यांची अमर्याद ाैसवणूक होत आहे. यावर ठोस उपाययोजना करताना साखर कारखान्यांचा वजनकाटा तपासण्यासाठी वजनकाटा निरीक्षकांना हक्काची वजनमापे असलेली हायड्रोलिक व्हॅन देण्यात आली होती.
व्हॅन लपवून ठेवण्यात आली; अधिकाऱ्यांची हकालपट्टी करा
सहायक नियंत्रक ते सर्व विभागांचे निरीक्षक यांनी साखर कारखानदारांशी हातमिळवणी करून व्हॅन लपवून ठेवली. गेल्या दहा वर्षांत या गाडीने एक किलोमीटरदेखील प्रवास केलेला नाही. कोटय़वधी रुपयांची हायड्रोलिक व्हॅन भंगारात टाकण्याचे षडयंत्र या अधिकाऱ्यांनी रचल्याचा आरोप करत हायड्रोलिक व्हॅन लपवण्यामागील झारीतील शुक्राचार्य कोण? ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण? वजने नसताना वार्षिक पडताळणी करताना क्षमतेच्या 50 टक्के वजन ठेवून तपासणी कशी केली? वैधमापनशास्त्र्ा विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांकडून हा संगनमताने केलेला कट असून, साखर कारखानदार यांच्या फायद्याचा आहे. त्यामुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या कोल्हापूर जिह्यातील वैधमापनशास्त्र्ा विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी रुपेश पाटील यांनी केली.


























































