
सामना ऑनलाईन । बंगळुरू
आतापर्यंत आपण दुकानात घुसून मालकाच्या नकळत चोऱ्या करणारे अनेक बिलंदर चोर पाहिले असतील. पण, मालकाच्या डोळ्यासमोरून लाखोंचे कपडे चोरून पसार होणाऱ्या एका महिला चोराने बंगळुरूत धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत सहा दुकानांतून लाखोंचा माल गायब करणाऱ्या या चोराला पोलीस अद्याप पकडू शकलेले नाहीत.
इंद्राणी रोयन यांचं बंगळुरूच्या इब्बलूर येथे स्वतःचं बुटिक आहे. बुटिकच्या शेजारीच त्यांचं घर आहे. इंद्राणी यांना नुकतंच बाळ झाल्याने त्या बाळाला सांभाळत आपला बुटिकचा व्यवसाय चालवतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाईलवर नेहा नावाच्या महिलेचा फोन आला. तिला कपडे खरेदी करायचे होते म्हणून ती त्यांच्या बुटिकचा पत्ता विचारत होती. इंद्राणी घरातल्या कामात व्यग्र असल्याने त्यांच्या पतीने तो फोन उचलला आणि त्या दहा मिनिटांनी समोरून फोन करतील, असं सांगत फोन ठेवून दिला. इंद्राणी घरातलं काम आटपून शेजारच्या त्यांच्या बुटिकमध्ये गेल्या तेव्हा त्यांना तिथे एक महिला दिसली. तिने आपलं नाव नेहा असं असून काही वेळापूर्वी फोन केल्याचं सांगितलं. या महिलेसोबत एक लहान मूलही होतं. नेहाने काही वेळ बुटिकमधले कपडे पाहिले आणि इंद्राणी यांच्याकडे पिण्यास पाणी मागितलं. इंद्राणी जेव्हा घरातून पाणी घेऊन आल्या तोपर्यंत ही महिला निघून गेली होती.
ही घटना झाली तेव्हा दुकानात चोरी झाल्याचं इंद्राणी यांच्या लक्षात आलं नव्हतं. पण, जेव्हा ग्राहक आपले कपडे तयार असल्याचं विचारत आले तेव्हा त्यांना रुपये एक लाख किमतीची साडी आणि ब्लाउज गायब झाल्याचं लक्षात आलं. सीसीटीव्ही फुटेजवरून पाहणी केली असता त्याच दिवशी सकाळी आलेल्या नेहा याच महिलेने ती साडी चोरल्याचं दिसून आलं. खरंतर जेव्हा ती महिला साडी चोरून पसार व्हायच्या बेतात होती, तेव्हाच इंद्राणी नेमक्या बुटिकमध्ये दाखल झाल्या होत्या. पण, सराईतपणे आपण काही चोरलं आहे असं न दाखवता तिने आपली बॅग बाजूला ठेवली आणि इंद्राणींशी गप्पा मारत राहिली. त्यावेळी तिच्या बॅगेत चोरलेले कपडे होते. पण, इंद्राणी यांना ते लक्षातही आले नाहीत.
सीसीटीव्ही फुटेजमधून सत्य समजल्यानंतर रोयन दाम्पत्याने त्वरित पोलीस स्टेशन गाठत या चोरीची तक्रार केली. त्यावेळी आसपासच्या परिसरातही या महिलेने अशाच प्रकारे चोरी करून लाखो रुपये किमतीचे कपडे पळवले असल्याचं त्यांना कळलं. सध्या बंगळुरू पोलीसही या साडीचोर महिलेच्या मागावर आहेत. ही महिला साधारण ३० वर्षे वयाची आहे. बंगळुरूमधील एका दुकानात ती यापूर्वी चोरी करताना पकडली गेली होती. मात्र, दुकानदाराने पोलिसात तक्रार न करता केवळ ताकीद देऊन तिला सोडून दिलं होतं.



























































