दुरुस्ती सुरू असतानाच कसाऱ्यातील रेल्वे पुलाला भगदाड; ढिगारा ट्रॅकवर कोसळला; बंदी असूनही अवजड वाहने धावत होती

शहरातील पूर्व व पश्चिम भागाला जोडणाऱ्या रेल्वे पुलाची दुरुस्ती सुरू असतानाच पुलाला आज मोठे भगदाड पडले. त्याचा ढिगारा थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळला. सुदैवाने त्यावेळी कोणतीही मेल, एक्स्प्रेस अथवा लोकल जात नव्हती. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली असून पूर्व व पश्चिमेचा संपर्क तुटला आहे. अवजड वाहनांना बंदी असूनही महाकाय ट्रेलर, कंटेनर, ट्रक या पुलावरून जात होते. जीर्ण झालेल्या पुलाला या वाहनांचा भार सहन न झाल्याने दुर्घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

कसारा शहराच्या पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा रेल्वेचा हा पूल अतिशय जुना आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करणे आवश्यक असताना संबंधित ठेकेदाराने एका मार्गाची वाहतूक चालूच ठेवली होती. मोखावणे या गावातील काही विकासकांनी बांधकाम साहित्य आणण्यासाठी मोठ्या क्रेन्स, ट्रकची वाहतूक याच पुलावरून मोठ्या प्रमाणात केली. हजारो टन वजनाचे लोखंड तसेच रेतीचीदेखील ने-आण केली. त्यामुळे पुलाची क्षमता कमी झाली.

…तर रुग्णासह रिक्षा पडली असती
जीर्ण झालेल्या पुलावरूनच अवजड वाहनांची वाहतूक सुरू असूनही स्थानिक ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस किंवा रेल्वे प्रशासन यांनी कोणताही विरोध केला नाही. अखेर पहाटेच्या सुमारास एका डंपरची वाहतूक सुरू असताना पुलाला मोठे भगदाड पडले आणि ढिगारा थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र भगदाड पडण्यापूर्वी काही क्षण आधीच रुग्ण घेऊन जाणारी रिक्षा पुलावरून गेली होती. पण ही रिक्षादेखील बचावली. अन्यथा अनर्थ घडला असता.

  • कसाऱ्यातील बाजारपेठेतून पश्चिमेकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, असा आग्रही धरला आहे.
  • या घटनेत कसारा शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीदेखील कोसळल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांवर पाणीबाणीची वेळ आली आहे