
मान्सूनचे आगमन होण्यास फक्त आठवडाभराचा कालावधी उरलेला असल्याने आगोट खरेदीसाठी विक्रमगडच्या बाजारात शेतकऱ्यांची सध्या मोठी झुंबड उडाली आहे. कांदे, बटाटे, लसूण, तिखट मिरची आणि हळदीचा चार महिने पुरेल इतका साठा प्रत्येक जण करून ठेवत आहे. आगोटची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने शेतमालाच्या दरात वाढ झाली आहे. कांदे आणि बटाट्याच्या गोणीच्या गोणी खरेदी केल्या जात आहेत.
मान्सून सुरू झाल्यानंतर पालघर परिसरात पावसाचा मुक्काम चार महिने असतो. पाऊस आणि शेतीची कामे यामुळे शेतकऱ्यांना चार महिने बाजारहाट करता येत नाही. त्यामुळे शेतकरी मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. चार महिने पुरेल इतका साठा केला जातो. याच खरेदीला आगोटची खरेदी असे म्हंटले जाते. सध्या विक्रमगडच्या बाजारपेठेत आगोटची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या संख्येने आगोटच्या खरेदीसाठी शहरात येत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत दररोज जत्रेप्रमाणे गर्दी होत आहे.
दर तेजीत आले
आगोटच्या खरेदीमुळे बाजारात आज कांदा 12-14, लसूण 140-160, बटाटे 25-30, तिखट मिरची 180-220 आणि हळद 200-220 रुपये किलो दराने विकली गेली आहे. या मालांचे बाजार विशेष तेजीत आले आहेत. पावसाळा जवळ आल्याने ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या संख्येने खरेदीसाठी शहरात येत आहेत. पाऊस सुरू झाल्यानंतर चार महिने भाजी आणण्यापासून ते सर्वच गोष्टीकरिता अडचणी निर्माण होतात. ही अडचण टाळण्यासाठी खरेदी महत्त्वाची असते, अशी प्रतिक्रिया शहरातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे


























































