
मुकुंद ढोबळे
जीवापाड जपलेल्या पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून गोठ्याभोवती उंच भिंती, लोखंडी भक्कम कुंपण उभारले. त्यामुळे बिबट्यापासून पशुधनाचे संरक्षण होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, बिबट्यानेही नवीन फंडा सुरू केला आहे. कुंपणाखालून गोठ्यात घुसून शेळ्यांचा तो फडशा पाडत आहे.
पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग, नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे.
ऊसतोडणी सुरू होताच, अधिवास धोक्यात आल्यामुळे विविध भागांत बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटना सुरू होतात. शेकडो शेळ्या, मेंढ्या, पाळीव जनावरांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. पुणे जिल्ह्यात विशेषतः जुन्नर, शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, हवेली तालुक्यांमध्ये उसाचे मोठे क्षेत्र आहे. जुन्नर तालुका हा बिबटप्रवण क्षेत्रात मोडतो. त्यामुळे या परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. जिल्ह्यात बिबट्याचे दर्शन आणि हल्ले आता रोजचीच बाब बनली आहे.
जिल्ह्याच्या विविध भागांत बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्याने जीवापाड जपलेल्या पशुधनाचा फडशा बिबट्या पाडत असल्यामुळे सर्वत्र दहशत पसरली आहे. धक्कादायक बाब म्हणजे लोखंडी कुंपणाखालची माती उकरून बिबट्या गोठ्यात घुसून शेळ्या, मेंढ्या फस्त करत आहे.
बिबट्याने पाडला सहा शेळ्यांचा फडशा
शिरसगाव काटा येथील मानेमळा परिसरात बुधवारी पहाटे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सहा शेळ्या ठार झाल्या. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून, वन विभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मानेमळा येथील शेतकरी महेश गंगाराम कोळपे यांच्या घराभोवती लोखंडी तारेचे कुंपण आहे. बिबट्याने बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास कुंपणाखालून प्रवेश करून शेळ्यांवर हल्ला केला. शेळ्यांच्या ओरडण्यामुळे सुरेखा कोळपे यांना जाग आली. त्यांनी आरडाओरडा करत बिबट्याच्या दिशेने धाव घेतली. घरातील इतर सदस्य जागे झाल्याचे पाहून बिबट्याने उसाच्या शेतात धूम ठोकली.
या हल्ल्यात एक शेळी जागीच मृत आढळली, तर पाच शेळ्यांचे मृतदेह सकाळी उसाच्या शेतात सापडले. वन विभागाचे कर्मचारी गणेश डोईफोडे व शरीफ शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तातडीने भरपाई मिळावी, अशी मागणी कोळपे यांनी केली आहे. बिबट्यांचा वाढता वावर पाहाता वन विभागाने पिंजरा लावून त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी घोडगंगा कारखान्याचे संचालक नरेंद्र माने यांनी केली आहे.
दोन वर्षातील दुसरी घटना
गोठ्यानजीकची माती उकरून सात शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील देवगाव येथे घडली होती. शारदा शिवराम वाळुंज यांच्या गोठ्यात ५ शेळ्या व २ बोकड होते. वाळुंज यांच्या गोठ्याभोवती बंदिस्त लोखंडी जाळी बसविली होती. सिमेंट विटांच्या खालील जमिनीची बाजू उकरून जाळीच्या खालील बाजूने बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून शेळ्या व बोकडांचा फडशा पाडला होता. ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना आपले जनावरांचे गोठे पूर्णपणे बंदिस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक शेतकरी दहा फूट उंचीपर्यंत जाळी लावतात, त्याच्यावर मात्र उघडे ठेवतात. बिबट्या दहा ते पंधरा फूट उंचीवर उडी मारूनदेखील गोठ्यात अनेक वेळा प्रवेश केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपले गोठे संपूर्ण बंदिस्त करावेत तसेच रात्रीच्या वेळी बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे.



























































