पोलिसांना घाबरून कैद्याने गिळला मोबाईल!

41

सामना ऑनलाईन । कोलकाता

पश्चिम बंगालच्या प्रेसिडेंसी तुरुंगात विचित्र घटना घडली आहे. एका बराकीतील कैदी लपूनछपून फोनवर बोलत होता. त्यावेळी अचानक पोलिसांचे भरारी पथक तपासणीसाठी आले. आता आपण पकडले जाणार या भीतीने त्या कैद्याने चक्क मोबाईलच गिळल्याची घटना उघड झाली आहे. पथक परत गेल्यानंतर काही वेळाने त्याने पोटात दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. घटनेला २४ तास उलटूनही मोबाईल बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलेले नाही.

रामचंद्र बागप्पा हा कैदी वर्षभरापासून या तुरुगांत आहे. त्याच्याजवळ मोबाईल फोन होता आणि लपून छपून तो त्या फोनवरून इतरांशी संवाद साधत होता. या तुरुंगात सोमवारी अचानक भरारी पथक तपासणीसाठी तुरुंगात आले. त्यावेळी रामचंद्र फोनवर बोलत होता. आता आपण पकडले जाणार या भीतीने त्याने मोबाईलच गिळला. भरारी पथक त्याच्या बराकीची तपासणी करून माघारी गेले. त्यानंतर काहीवेळातच पोट दुखत असल्याची तक्रार रामचंद्रने केली. त्याला रुग्णालयात दाखल करून एक्सरे काढला असता त्याने मोबाईल गिळल्याचे उघड झाले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला औषधे दिली आहेत. दोन दिवसात मोबाईल बाहेर आला नाही तर शस्त्रक्रिया करून तो बाहेर काढावा लागेल असे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

कैद्याने मोबाईल गिळल्याची घटना प्रथमच घडल्याचे विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तुरुंगात सुरक्षा व्यवस्था असताना कैद्याकडे मोबाईल आलाच कसा असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच हा मोबाईल कैद्याने गिळलाच कसा असा सवालही उपस्थित होत आहे. या घटनेमुळे तुरुंगाच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या