अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप काॅंग्रेसची अजब-गजब युती, सोशल मीडियावर विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नेटकऱ्यांनी घेतला समाचार 

राज्यामध्ये सध्या महापालिका निवडणुकांचे रणकंदन सुरु झालेले आहे. अशामध्येच अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भाजपने काॅंग्रेससोबत हातमिळवणी केली आहे. या भाजप काॅंग्रेसच्या युतीवर ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. दोन्ही पक्ष हे वेगळ्या विचारसरणीचे असले तरीही झालेल्या या युतीमुळे अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत. शिंदे गटाला बाहेर ठेवण्यासाठी भाजपने केलेल्या या खेळीमुळे, महायुतीमधील धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. सोशल मीडियावर यामुळे भाजपला चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे.

राजदीप सरदेसाई यांनी याच मुद्द्यावर एक्सवर पोस्ट केली आहे. ते म्हणतात, भाजप-काँग्रेस युती???!!! कदाचित देशात पहिल्यांदाच, अंबरनाथ नगरपालिकेत भाजप आणि काँग्रेस सत्तेवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आले आहेत! महाराष्ट्रात आता स्पष्ट होत असल्याप्रमाणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काहीही होऊ शकते!

महिनाभरापूर्वी झालेल्या अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या तेजश्री करंजुले पाटील यांना शिंदे गटाच्या मनिषा वाळवेकर यांनी पराभव केला होता. त्यामुळेच शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवून बहुमताचे गणित जुळवण्यासाठी भाजपने ही खेळी खेळली आहे.