
धाराशिव येथून मुंबईला दोन टन गोमांस नेणारा टेम्पो अडवून खडकी पोलिसांनी तिघांना अटक केली. जून्या मुंबई पुणे रस्त्यावरील खडकी जकातनाका भागात ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर खडकी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद सोहेब अजीज (37, रा. वाशी, नवी मुंबई), तन्वीर अहमद कुरेशी (42, रा. वाशी, नवी मुंबई), शौकद हमीद कुरेशी (35, रा. धाराशिव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत 27 वर्षांच्या तरूणाने तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी दुपारी जून्या मुंबई – पुणे रस्त्यावरील खडकी जकातनाका भागात ही कारवाई करण्यात आली.
धाराशिव येथून एका टेम्पोत दोन टन गोमांस असून काहीजण मुंबई येथे जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी तात्काळ तपास करत आरोपींना पकडण्याच्या सूचना केल्या. यानूसार पोलिसांच्या पथकाने जून्या मुंबई – पुणे रस्त्यावर सापळा लावला. या दरम्यान दुपारच्या सूमारास जकातनाका भागातून जाणारा संशयीत टेम्पो पोलिसांच्या पथकाने अडविला. टेम्पोची पाहणी केली असता त्यामध्ये गोमांस आढळून आले. त्यानूसार पोलिसांनी आरोपींसह टेम्पो ताब्यात घेतला. टेम्पोतील सय्यद अजीज आणि तन्वीर कुरेशी यांच्याकडे केलेल्या चौकशीत ते गोमांस घेवून मुंबईला जात असल्याचे निष्पन्न झाले. यानूसार पोलिसांनी दोघांसह त्यांचा साथीदार कुरेशी याला अटक करून त्यांच्यावर खडकी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शारदा वालकोळी, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, संतोष भांडवलकर, पोलीस नाईक उद्धव कलंदर, अंमलदार सागर जाधव, शिवराज खेड यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. सहायक निरीक्षक वालकोळी या पुढील तपास करत आहेत.
जून्या मुंबई – पुणे रस्त्यावरून गोमांस घेवून टेम्पो जाणार असल्याचे समजल्यानंतर सापळा रचून आरोपींना अटक करण्यात आली. मुंबई येथे हा टेम्पो जाणार होता.
– विष्णू ताम्हाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस ठाणे



























































