टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या ‘रन’धुमाळीला जेमतेम हाताच्या बोटावर मोजण्याइतके दिवस उरले आहेत. अमेरिका आणि वेस्ट इंडीज यांच्या संयुक्त यजमानीत 2 ते 29 जूनपर्यंत रंगणाऱया टी-20 वर्ल्ड कपमध्ये 20 संघ भिडणार आहेत. अमेरिकेने या स्पर्धेसाठी न्यूयॉर्क येथे तात्पुरते नसाऊ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम उभारले आहे. यासाठी खेळपट्टय़ा या ऑस्ट्रेलियातून आयात केल्या असून प्रेक्षकांना बसण्यासाठीचे स्टँड्स हे फॉर्म्युला वन शर्यतीचे आहेत. या स्टेडियमवर टी-20 वर्ल्ड कपच्या आठ लढती रंगणार आहेत, हे विशेष.
पार्किंग लॉटमध्ये तयार केले क्रिकेट स्टेडियम
न्यूयॉर्क हे शहर मोठय़ा कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी ओळखले जाते. हिंदुस्थान-पाकिस्तान विश्वचषक सामना न्यूयॉर्कमध्येच होत आहे. ज्या स्टेडियममध्ये हिंदुस्थान-पाकिस्तान सामना खेळला जाईल ते आधी न्यूयॉर्क आयलँडर्स या आइस हॉकी संघाचे मैदान होते. नसाऊ कोलिसियममध्ये इतर इनडोअर स्टेडियम आहेत. हे क्रिकेट स्टेडियम आइजनहावर पार्कच्या आत आहे. न्यूयॉर्क आयलँडचे खेळाडू जेथे खेळायचे तिथे प्रेक्षकांची बसण्याची क्षमता 16 हजार इतकी होती. मात्र टी-20 वर्ल्ड कपच्या निमित्ताने येथे क्रिकेटप्रेमींची गर्दी होणार आहे. त्यामुळे आजूबाजूला असणाऱया पार्किंगची जागाही स्टेडियमसाठी घेण्यात आली. इनडोअर स्टेडियम आणि पार्किंगची जागा एकत्र करून क्रिकेट मैदानात रूपांतरित करण्यात आले आहे. 34 हजार प्रेक्षक बसू शकतील अशी व्यवस्था या स्टेडियमवर करण्यात आलेली आहे. क्रिकेट वर्ल्ड कपच्या इतिहासात प्रथमच तात्पुरत्या उभारलेल्या स्टेडियमचा वापर होणार आहे. याच स्टेडियमवर हिंदुस्थान-पाकिस्तान या कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांसह गट फेरीतील आठ सामने होणार आहेत.
वर्ल्ड कपमध्ये प्रथमच दुसऱया देशातील खेळपट्टय़ा
या मैदानासाठीच्या खेळपट्टय़ा ऑस्ट्रेलियात बनविण्यात आल्या. या वर्षी जानेवारीमध्ये दहा खेळपट्टय़ा समुद्रामार्गे फ्लोरिडामध्ये (अमेरिका) आणण्यात आल्या. येथे पाच महिने या खेळपट्टय़ांना अंतिम रूप देण्यात आले व नंतर मे महिन्यात त्या नसाऊ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये फिट करण्यात आल्या. प्रेक्षकांसाठीची आसनक्षमता वाढविण्यासाठी फॉर्म्युला वन स्टेडियमवरील स्टँड्स लावण्यात आले आहेत. दहापैकी सहा खेळपट्टय़ा या सरावासाठी असून चार खेळपट्टय़ांवर वर्ल्ड कपच्या आठ लढती रंगणार आहेत. वर्ल्ड कपच्या इतिहासात यंदा प्रथमच दुसऱया देशात बनविलेल्या खेळपट्टय़ांचा वापर होणार आहे, हे विशेष.