डोंगर खोदून तयार केला तीन किलोमीटरचा रस्ता; ओडिशाचे ‘दशरथ मांजी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी नकार दिल्यानंतरही हार न मानता 30 वर्षे कठोर परिश्रम करून ओडिशातील आदिवासी शेतकरी हरिहर बेहरा आणि त्यांच्या भावाने डोंगराएवढी कामगिरी केली आहे. हरिहर यांनी मोठय़ा जिद्दीने डोंगर खोदून तीन किलोमीटरचा रस्ता तयार केला आहे. ओडिशाचे ‘दशरथ मांजी’ अशी त्यांची ओळख बनली आहे.

हरिहर बेहरा भुवनेश्वरपासून 85 किलोमीटर अंतरावर नयागढ जिह्यातील तुलुबी गावात राहतात. त्यांचे गाव दुर्गम भागात आहे. तिथे जाण्यासाठी रस्ता नाही. गावकऱयांना ये-जा करण्यासाठी जंगलातून वाट काढावी लागते. त्यामुळे जंगली श्वापदांचा धोका असतो. या पार्श्वभूमीवर हरिहर यांनी रस्ता बनवण्याचा निर्धार केला. त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. मात्र रस्त्याचे काम अशक्य असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर हरिहर यांनी स्वत:च रस्ता बनवण्याचे काम सुरू केले. गावचा रस्ता बनवण्यासाठी त्यांनी आयुष्याची तीन दशके खर्ची घातली.

भावाने केली मदत

हरिहरला सर्वांनी विरोध केला असला तरी भाऊ त्यांच्या पाठीशी उभा राहिला. दोन्ही भावांनी मिळून 3 किलोमीटर रस्ता बनवला. दोघांनी मिळून मोठमोठे दगड पह्डले, माती बाजूला केली. या कामाला 30 वर्षे लागली. आज हरिहरच्या घरापर्यंत गाडी पोहोचू शकते. बाजारात जाण्यासाठी गावकऱयांना किंवा शाळेत जाण्यासाठी मुलांना डोंगर चढावा लागत नाही.