
औध येथील 16 गावांच्या उपसा सिंचन योजनेवर तातडीने निधी मंजूर करावा, वंचित गावांचा समावेश करावा, येथील वंचित भागाला तातडीने न्याय द्यावा, तसेच येत्या अर्थसंकल्पात तरतूद न झाल्यास 22 गावे मुख्यमंत्र्यांच्या दारात दरे गावी बसणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी मागण्यांचे निवेदन वडूज तहसीलदारांना देण्यात आले.
औंधसह 16 गावांच्या उपसा सिंचन योजनेसाठी गेली अनेक वर्षे लढा सुरू आहे. मात्र, अजूनपर्यंत या गावांना न्याय मिळाला नाही. कण्हेर जलाशयातून 7 जानेवारी 2022 रोजी 1.25 टी. एम. सी पाणी आरक्षित करण्यात आले असून, ही योजना पूर्ण क्षमतेने चालू होण्यासाठी निधी आवश्यक आहे. या मागणीसाठी आज वडूजमध्ये हजारो शेतकरी उपस्थित होते.
प्रभाकर देशमुख म्हणाले, ‘सरकारला जाब विचारणे आपले कर्तव्य आणि हक्क आहे, या योजनेला निधी मिळण्यासाठी 22 गावांच्या लढाईला आमचा पाठिंबा आहे. आरक्षित झालेले पाणी पूर्ण क्षमतेने उचलले जात नाही, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.’ रणजितसिंह देशमुख म्हणाले, ‘औंधच्या शेती-पाणी संघर्ष समितीचा हा खटाव तालुक्याचा लढा एकदिलाने करा, हा लढा व्यापक होण्यासाठी जे करायचे आहे त्यासाठी आम्ही तयार आहोत, लोकप्रतिनिधींनी या भागाला वेठीस धरण्याचे काम केले आहे.’ अध्यक्ष संतोष मांडवे, सूर्यभान जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी शेती पाणी संघर्ष समितीने ठराव करून उपस्थितांची मंजुरी घेण्यात आली. यामध्ये निधी हातात पडेपर्यंत 22 गावांतील सरकारी कर, वसुली बंद करण्यात यावी, शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावी, बँकांची कर्जाची वसुली थांबविण्यात यावी, महावितरणने शेतकऱयांचे प्रश्न तातडीने सोडवावेत आदी ठरावावर मंजुरी घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रभाकर देशमुख, रणजितसिंह देशमुख, स्वाभिमानीचे अनिल पवार, सूर्यभान जाधव, संतोष मांडवे आदींसह 22 गावचे ग्रामस्थ, महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.



























































